भुईकोट किल्ला मैदानावर रंगतोय फुटबॉलचा थरार; 24 संघांचा सहभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कै. रामाशंकर कनोजिया (बाटा) स्मृती 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ला मैदानावर उत्साहात झाला. किल्ला व्हॉलीबॉल सदस्य आणि सुमन एंटरप्रायजेस फुटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (ADFA) च्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, संयुक्त सचिव प्रदीप जाधव व व्हिक्टर जोसेफ, तसेच कार्यकारिणी सदस्य राजू पाटोळे व जेव्हिअर स्वामी आदींसह कनोजिया परिवारातील सर्व सदस्य व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत 24 संघांनी सहभाग नोंदविला असून, जिल्ह्यातील फुटबॉलप्रेमींसाठी ही स्पर्धा आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये सुमन एंटरप्रायजेस एफसीने तक्षिला हायस्कूल संघाचा 2-1 असा पराभव केला. तर आयएफसी संघाने फिरोदिया शिवाजियन्स अकादमीवर 2-0 असा विजय मिळविला.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात फुटबॉलच्या विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत मानद सचिव रोनप फर्नांडिस यांने व्यक्त केले. सर्व सहभागी संघांना त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश बैद, नंदू लालबोंद्रे, जावेद शेख, फारुख शेख, प्रसाद हराळे, संकेत बनसोडे, आकाश चिंचिने, आसिफ शेख, विलास शेळार, वैभव मनोदिया, शशांक वाल्मिकी, ऋषी पाटोळे, दाऊद शेख, सुमित राठोर आणि प्रकाश कनोजिया यांनी विशेष परिश्रम घेतले.

