किरण चोरमले महाराष्ट्राच्या U-23 संघाचा कर्णधार; अश्कान काझीचीही संघात निवड
BCCI च्या वतीने आयोजित कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रतिभावान क्रिकेटपटू किरण चोरमले आणि अश्कान काझी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी 2026-27 स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीने क्रिकेट क्षेत्रात अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या निवडीमध्ये विशेष अभिमानाची बाब म्हणजे किरण चोरमले याच्यावर महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपली गुणवत्ता सिध्द केली आहे.
किरण चोरमले हा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज असून तो उजव्या हाताने फिरकी गोलंदाजीही करतो. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांतील कौशल्याच्या जोरावर त्याने क्रिकेटमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, किरणने यापूर्वी महाराष्ट्राच्या 14, 16, 19 आणि 23 वर्षांखालील विविध वयोगटांतील संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी, खेळातील शिस्त, नेतृत्वगुण आणि अनुभवाच्या बळावर त्याने महाराष्ट्राच्या युवा क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. किरणच्या क्रिकेट कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याने यापूर्वी महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. तसेच, आशिया कप स्पर्धेत भारतीय 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही त्याला मिळाली होती. 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्येही त्याचा समावेश झाला होता. आता महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील संघाचे नेतृत्व करण्याची संधी त्याला प्राप्त झाली आहे.
दरम्यान, अश्कान काझी याचीही महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील संघात निवड झाल्याने अहिल्यानगरच्या क्रिकेट क्षेत्राला आणखी एक यश मिळाले आहे. अश्कान हा डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज असून त्यानेही महाराष्ट्राच्या 14, 16, 19 आणि 23 वर्षांखालील संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. विविध वयोगटांतील क्रिकेट स्पर्धांमधून मिळालेला अनुभव आणि सरावातील सातत्य यांच्या बळावर त्याने ही महत्त्वपूर्ण संधी मिळविली आहे. राज्याच्या युवा संघात एकाच अकॅडमीतील दोन खेळाडूंची निवड होणे, ही संबंधित अकॅडमीसह जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्रासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.
दोन्ही खेळाडू अहिल्यानगर येथील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक सरफराज बांगडीवाले आणि वसीम हुंडेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत, तांत्रिक कौशल्यांचा विकास आणि स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव यांमुळे त्यांच्या खेळाला अधिक प्रतिभा मिळाली आहे. याशिवाय, हे दोन्ही खेळाडू अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघाचे नियमित खेळाडू असून, जिल्ह्यातील क्रिकेटला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.
कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविणे, ही खेळाडूंच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यातच किरण चोरमले याची कर्णधारपदी निवड झाल्याने त्याच्या नेतृत्वगुणांवर आणि क्षमतेवर विश्वास व्यक्त झाला आहे. आगामी स्पर्धेत दोन्ही खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करून महाराष्ट्राच्या संघाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा हुंडेकरी अकॅडमीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप आणि संघटनेचे सचिव गणेश गोंडाळ यांनी किरण चोरमले व अश्कान काझी यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

