• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर जिल्हास्तरीय कनिष्ठ गट ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

ByMirror

Jul 14, 2026
1 व 2 ऑगस्ट रोजी लोणी येथे रंगणार ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा

1 व 2 ऑगस्ट रोजी लोणी येथे रंगणार ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ‘अहिल्यानगर जिल्हास्तरीय कनिष्ठ गट मैदानी स्पर्धा (ज्युनिअर ॲथलेटिक्स) अजिंक्यपद स्पर्धा 2026-2027’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आगामी 1 आणि 2 ऑगस्ट 2026 रोजी लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पार पडणार असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व क्वालिफायिंग स्टँडर्ड्स पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची डेरवण (जि. रत्नागिरी) येथे दिनांक 27 ते 30 ऑगस्ट रोजी
येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. या स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र कोतकर व सचिव दिनेश भालेराव यांनी केले आहे.


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक असून, 28 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर (https://register.smrsports.com/Competition/Ahilyanagar_District_Junior_Athletics_Meet_2026) प्रवेशिका जमा करता येतील. ही स्पर्धा केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठीच आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये 14, 16, 18 आणि 20 वर्षांखालील अशा चार वयोगटांचा समावेश असून, खेळाडूचे वय किमान 12 वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक आहे.
खेळाडूंनी वय पडताळणीसाठी येथे येताना सक्षम प्राधिकाऱ्याचा जन्माचा दाखला (ज्याची नोंदणी जन्मानंतर दोन वर्षांच्या आत झालेली असावी), 10 वीचे बोर्ड प्रमाणपत्र आणि आधार कार्ड ही मूळ कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. शनिवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून स्पर्धा स्थळी ऑनलाइन नोंदणी केलेल्या खेळाडूंना चेस्ट नंबरचे वाटप केले जाईल. स्पर्धा संपल्यानंतर चेस्ट नंबर जमा केल्यावर सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, तर वयाची पडताळणी झाल्यानंतर आणि संबंधित खेळ प्रकारात किमान 4 खेळाडू असल्यास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.


या स्पर्धेसाठी निवास व जेवण याची कोणतीही व्यवस्था आयोजकांकडून केली नसून, ती खेळाडू व पालकांनी स्वतः करावी लागणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान होणाऱ्या कोणत्याही दुखापतीला किंवा नुकसानीला असोसिएशन जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी दिनेश भालेराव 9923837888, श्रीरामसेतु आवारी 9322015046, जगन गवांदे 9881328186, सुजय बाबर 7507681726, यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *