• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या शहरातील धावपटूंचा गौरव

ByMirror

Jul 3, 2026
युवकांनी आरोग्य व क्रीडेकडे वळावे, धावपटूंचे आवाहन

धावपटूंनी सांगितला 85.77 किलोमीटरच्या मॅरेथॉन धावण्याचा थरार; तर अनेक महिन्यांचा खडतर सराव


युवकांनी आरोग्य व क्रीडेकडे वळावे, धावपटूंचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इन्फिनिटी सायकलिंग अकॅडमी, बाईक टेक पॉईंट आणि इन्फिनिटी सायकलिंग कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून परतलेल्या अहिल्यानगरच्या धावपटूंचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्‍वात उज्ज्वल करणाऱ्या धावपटूंचा सत्कार करण्यात आला.


दक्षिण आफ्रिकेतील डरबन ते पीटरमारित्झबर्ग या दोन शहरांदरम्यान पार पडलेल्या 85.77 किलोमीटर अंतराच्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगरचे डॉ. अमित बडवे, जस्मित वधवा, सुनील बनकर, डॉ. संकेत मुंदडा आणि सचिन राणे यांनी यशस्वीरित्या शर्यत पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशाबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकात संभाजी मोहिते यांनी शहरात आरोग्य चळवळ वेगाने रुजत असल्याचे सांगितले. सायकलिंग आणि धावण्याकडे युवक-युवती मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असून सकाळच्या व्यायामाची सवय वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू घडावेत, या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. नुकत्याच जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर 15 ऑगस्ट रोजी पुन्हा भव्य सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.


कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि अत्यंत कठीण अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक मानली जाते. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेचे यंदाचे 99 वे वर्ष होते. दरवर्षी जगभरातील हजारो धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. यंदा सुमारे 22 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारतातून 250 हून अधिक धावपटूंनी स्पर्धेत भाग घेतला असून त्यामध्ये अहिल्यानगरच्या पाच धावपटूंनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.
या स्पर्धेत डॉ. अमित बडवे यांनी अवघ्या 9 तास 58 मिनिटांत अंतर पूर्ण करत मानाचे प्लॅटिनम पदक पटकाविले. त्याचबरोबर जस्मित वधवा यांनी 10 तास 7 मिनिटे, डॉ. संकेत मुंदडा यांनी 10 तास 23 मिनिटे, सुनील बनकर यांनी 11 तास 10 मिनिटे, तर सचिन राणे यांनी 11 तास 53 मिनिटांत ही अत्यंत कठीण स्पर्धा पूर्ण करून नगरच्या क्रीडा इतिहासात आणखी एक मानाचा अध्याय जोडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी धावपटूंच्या जिद्द, चिकाटी, शिस्त आणि अथक परिश्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय यशामुळे शहरातील युवकांना क्रीडा क्षेत्राकडे प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.


कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे धावपटू जस्मितसिंह वधवा यांनी सांगितले की, प्रत्येकाने आयुष्यात एखादा छंद जोपासला पाहिजे, त्यामुळे जीवन अधिक आनंदी आणि निरोगी बनते. गेल्या चार-पाच वर्षांपासून सायकलपटू म्हणून कारकीर्द करत असताना कॉम्रेड मॅरेथॉनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जवळपास वर्षभर कठोर मेहनत घेतली. सलग आठ महिने चाँदबीबी महाल परिसरात नियमित सराव केला. उन्हाळ्यात मध्यरात्री 12 वाजता धावण्यास सुरुवात करून पहाटेपर्यंत रात्रभर सराव केला, अशी मेहनतीची कहाणी त्यांनी सांगितली.


सुनील बनकर यांनी 2017 मध्ये केवळ 10 किलोमीटर धावण्यापासून सुरुवात केल्याचे सांगितले. सातत्यपूर्ण सराव, सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळे आज कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करण्याचे स्वप्न साकार झाले. परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सचिन राणे यांनी आयुष्यात पैसा कमावताना अनेकजण शरीररूपी संपत्तीची उपेक्षा करतात. आरोग्य हीच खरी संपत्ती असून त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे, असा संदेश त्यांनी दिला. मोबाईलमध्ये गुंतलेल्या नव्या पिढीसमोर आरोग्याचे मोठे आव्हान उभे राहत असून खेळ आणि व्यायामाचे महत्त्व भविष्यात अधिक वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


यावेळी मलेशिया येथे फुल आर्यनमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे चेतन नवलानी (16 तास 46 मिनिटे) आणि दिनेश संकलेचा (15 तास 28 मिनिटे) यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. दोघांनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील अनुभव सांगत सातत्यपूर्ण सराव आणि मानसिक तयारीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देणारे गौरव फिरोदिया यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणेश पवार, माजी सायकलिस्ट लाला कांबले, धन्यकुमार हराळ, मुबीन शेख, मयुर गवळी यांच्यासह शहरातील सायकलप्रेमी व रनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर मुळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानून वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *