राजीनाम्याच्या मागणीसाठी साखळी उपोषणाचा बारावा दिवस;
लोकशाहीतील मतदानाच्या पवित्र अधिकाराचे हरण कलियुगातील रावणाने केल्याचा आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवारी (दि. 20 ऑक्टोबर) बारावा दिवस होता. विजयादशमीचे औचित्य साधून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची प्रतीकात्मक रावण प्रतिकृती तयार करून तिला जोडे मारो आंदोलन केले. लोकशाहीतील मतदानाच्या पवित्र अधिकाराचे हरण केल्याचा आरोप करत आंदोलकांनी ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे साखळी उपोषण सुरू आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी ज्ञानेशकुमार यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक रावणाची प्रतिकृती तयार केली. लोकशाहीत मतदारांचा मतदानाचा अधिकार सर्वोच्च असून, या अधिकाराचे संरक्षण करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. यावेळी ज्ञानेशकुमार हे आजच्या युगातील रावण असल्याचा आरोपही करण्यात आला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, मतदारयादीतील कथित अनियमिततांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेबाबतही आंदोलकांनी विरोध दर्शविला. ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत निवडणूक प्रक्रियेतील कथित त्रुटी आणि मतदारांच्या अधिकारांच्या संरक्षणाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
मतदारयादीतील अनियमिततांमुळे पात्र मतदारांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होऊ नये. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असावी, तसेच मतदारांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला मंगळवारी बारा दिवस पूर्ण झाले. विजयादशमीच्या दिवशी प्रतीकात्मक रावणाला जोडे मारून निषेध व्यक्त करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी लावून धरली.
या आंदोलनात रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, प्रकाश थोरात, गुलाम शेख, अजीम खान, स्वप्नील साठे, लकी वाघमारे, अजीज शेख, अजय बडोदे, जमीर सय्यद, अरबाज शेख, जावेद सय्यद, आदिल शेख, योहान चाबुकस्वार, नईम शेख, ज्योती पवार, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, रेश्मा जाधव आदी सहभागी झाले होते. मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण, मतदारयादीतील कथित अनियमिततांची चौकशी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या मागण्यांसाठी रिपाइंचे आंदोलन सुरू आहे.

