• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

सेंट सेव्हिअर्स हायस्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट!

ByMirror

Oct 18, 2026
10 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई

10 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई


मल्लखांब, योगासने, कराटे अन्‌ शूटिंगमध्ये सेंट सेव्हिअर्सच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सेंट सेव्हिअर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. शाळेच्या खेळाडूंनी एकूण 10 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई केली. मल्लखांब, योगासने, शूटिंग, कराटे, वुशू, तायक्वांदो, कॅरम आणि गोळाफेक आदी क्रीडाप्रकारांत खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चमक दाखवली.


विविध वयोगटांतील खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळविले. विशेषतः 19 वर्षांखालील गटातील योगासन स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई केली. तसेच 17 वर्षांखालील गटात कराटे, वुशू, शूटिंग आणि मल्लखांब या क्रीडाप्रकारांतही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
14 वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात आरेज मुजद्दीन सय्यद याने कराटे स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. अखिफा जहीर मुनावर हिने कराटे स्पर्धेत रौप्यपदक मिळविले, तर झिक्रा फैजान शेख हिने कराटेमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. मुजम्मिल मुजसल याने कॅरम स्पर्धेत कांस्यपदक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले.


17 वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात सपुरा शेख हिने कराटे व वुशू या क्रीडाप्रकारांत सुवर्णपदके पटकावली. चैतन्य गंधाडे याने शूटिंग स्पर्धेत, तर सार्थक मस्के याने मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
शेख उमान कुसुम वसीम याने तायक्वांदो व कराटे स्पर्धांमध्ये अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवून यश संपादन केले. तम्मिम सय्यद जावेद याने कराटे व वुशू स्पर्धांमध्ये रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली. मुआज शेख याने कराटे व वुशू स्पर्धांमध्ये रौप्यपदक मिळवत शाळेच्या यशात भर घातली.


19 वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात सेंट सेव्हिअर्सच्या खेळाडूंनी विशेष चमक दाखविली. वेदांत क्षत्रिय याने गोळाफेक (शॉटपुट) स्पर्धेत रौप्यपदक मिळविले.
योगासन स्पर्धेत आरती पवार आणि आर्शिन शेख यांनी आर्टिस्टिक पेअर योगा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. समायरा डाकुआ आणि खुशी लोंढे यांनी रिदमिक पेअर योगा प्रकारात सुवर्णपदक मिळविले. सार्थक झा आणि सोहम विधाते यांनी आर्टिस्टिक पेअर योगा प्रकारात सुवर्णपदकांची कमाई केली. स्तुती धुमाळ हिने ट्रॅडिशनल योगा प्रकारात रौप्यपदक, तर विशाल मुंढे याने याच प्रकारात कांस्यपदक मिळविले.


खेळाडूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप काकडे, प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे, पर्यवेक्षिका संध्या खरात, ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा काकडे, जॉन सोनवणे आणि डेव्हिड पाटोळे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रशांत जमधाडे आणि वैभव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. शालेय व्यवस्थापनाने खेळाडूंच्या यशाचे कौतुक करून भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *