• Fri. Jul 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

सोमवार पासून फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित 8 व्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला होणार प्रारंभ

ByMirror

Jul 24, 2026

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार फुटबॉलचा थरार

53 संघ, 100 हून अधिक सामने

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या आणि शालेय फुटबॉलमधील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित 8 व्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला सोमवार, 27 जुलै पासून अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर प्रारंभ होत आहे. रोजी सकाळी 10.30 वाजता फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा अहमदनगर महाविद्यालयाच्या सौजन्याने व अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (ADFA) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे मुख्य विश्‍वस्त व फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया तसेच शिवाजियन्स स्पोर्ट्‌स क्लबचे अध्यक्ष व फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या विशेष पुढाकाराने पार पडत आहे. शालेय स्तरावरील फुटबॉलला चालना देणे, गुणवंत खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्यात फुटबॉल संस्कृती अधिक बळकट करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.


स्पर्धेचे उद्घाटन सहभागी शाळांच्या कर्णधारांच्या हस्ते होणार असून, यावेळी अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य, फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर तसेच अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या स्पर्धेत 53 संघ सहभागी होत असून 12 वर्षांखालील मुले, 14 वर्षांखालील मुले, 16 वर्षांखालील मुले आणि 16 वर्षांखालील मुली अशा चार गटांत 100 हून अधिक सामने खेळविण्यात येणार आहेत. लीग-कम-नॉकआऊट पद्धतीने आयोजित होणारी विभागातील ही एकमेव आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा असून प्रत्येक संघाला साखळी फेरीत आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.


उत्तम नियोजन, शिस्तबद्ध आयोजन, दर्जेदार पंच व्यवस्था, खेळाडूंसाठी आवश्‍यक सुविधा आणि व्यावसायिक व्यवस्थापन यामुळे या स्पर्धेने राज्यातील शालेय फुटबॉलमध्ये वेगळे स्थान निर्माण केले असून, ही स्पर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखली जाते.


अहमदनगर महाविद्यालयाने आपले फुटबॉल मैदान उपलब्ध करून दिल्यामुळेच एवढ्या मोठ्या स्वरूपातील स्पर्धेचे आयोजन शक्य झाले आहे. त्यांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी महाविद्यालय व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुटबॉलचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या उपक्रमाला सर्व फुटबॉलप्रेमी, क्रीडाप्रेमी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवा खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेच्या नियोजन व आयोजनासाठी फुटबॉल असोसिएशनचे सचिव रौनप फर्नांडिस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या मुख्य आयोजन समितीचे सदस्य पल्लवी सैंदाणे, राजेश अँथनी, अभिषेक सोनवणे, अभय साळवे, जेव्हिअर स्वामी आणि सचिन पात्रे, तसेच फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी व शिवाजियन्स स्पोर्ट्‌स क्लबचे सदस्य, प्रशिक्षक व खेळाडू स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहे. तसेच स्पर्धेसाठी सहभागी शाळांचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे देखील सहकार्य लाभत आहे.

मागील वर्षीचे (सन 2025) विजेते
16 वर्षांखालील मुले : आठरे पाटील पब्लिक स्कूल
14 वर्षांखालील मुले : तक्षिला स्कूल
12 वर्षांखालील मुले : प्रवरा पब्लिक स्कूल
16 वर्षांखालील मुली : प्रवरा पब्लिक स्कूल

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *