• Tue. Aug 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरच्या महिला फुटबॉल संघाचा जळगावमध्ये गोलांचा धडाका!

ByMirror

Aug 25, 2026
अहिल्यानगरच्या महिला फुटबॉल संघाचा जळगावमध्ये गोलांचा धडाका!

वर्धा संघाचा 12-1 गोलने उडविला धुव्वा; सुमय्या शेखच्या 7 गोलसह वरिष्ठ महिला संघाची दिमाखदार आगेकूच


वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदासाठी अहिल्यानगरच्या रणरागिणी सज्ज


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एडीएफए) वरिष्ठ महिला फुटबॉल संघाने वरिष्ठ महिला आंतरजिल्हा फुटबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 मध्ये दमदार सुरुवात करत वर्धा जिल्हा संघाचा तब्बल 12-1 गोलने एकहाती पराभव केला. सोमवार, दि. 24 ऑगस्ट रोजी झालेल्या या सामन्यात अहिल्यानगरच्या महिला खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मैदानावर वर्चस्व राखले. या दणदणीत विजयामुळे अहिल्यानगर संघाने स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली आहे.


21 ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत जळगाव येथे या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा संघाने उपविजेतेपद (सेकंड रनर्स-अप) मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली होती. यंदा त्या कामगिरीची पुनरावृत्ती न करता थेट विजेतेपदावर नाव कोरण्याचा निर्धार संघातील खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
वर्धाविरुद्धच्या सामन्यात अहिल्यानगरच्या सुमय्या शेख हिने अक्षरशः गोलचा पाऊस पाडत तब्बल 7 गोल नोंदविले. तिच्या आक्रमक आणि प्रभावी खेळामुळे वर्धा संघाच्या बचावफळीवर मोठा दबाव निर्माण झाला. यानंतर तनिषा शिरसाठ हिनेही शानदार खेळ करत तब्बल 4 गोल केले. निकिता रामावत हिने 1 गोल नोंदवत संघाच्या विजयात मोलाची भर घातली. अशा प्रकारे अहिल्यानगरने एकूण 12 गोल करत वर्धा संघावर 12-1 असा दणदणीत विजय मिळविला.


सामन्यात अहिल्यानगरच्या खेळाडूंनी दाखविलेली आक्रमकता, वेगवान पासिंग, उत्कृष्ट सांघिक समन्वय आणि गोल करण्याच्या संधींचे अचूक रूपांतर यामुळे संघाने प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. मागील वर्षीच्या स्पर्धेत मिळविलेल्या उल्लेखनीय यशानंतर यंदा अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी संघाने तयारी केली आहे. शिस्त, संघभावना, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे उद्दिष्ट संघासमोर आहे.
संघाच्या जळगावकडे रवाना होण्याप्रसंगी अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रोनप फर्नांडिस, समिती सदस्या पल्लवी सैंदाणे, गुलमोहर फुटबॉल क्लबचे सुभाष कानोजिया आणि फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबचे अभिषेक सोनावणे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेळाडू व प्रशिक्षकांना शुभेच्छा देत स्पर्धेसाठी संघाला प्रोत्साहन दिले.


अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद व अमरजीत सिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव व व्हिक्टर जोसेफ, कोषाध्यक्ष रिशपाल सिंग परमार, सहायक कोषाध्यक्ष रणबीर सिंग परमार तसेच समिती सदस्य राजू पाटोळे यांनी अहिल्यानगर जिल्हा वरिष्ठ महिला संघाने पहिल्याच सामन्यात मिळविलेल्या दणदणीत यशाचे अभिनंदन करून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संघाने शिस्त, संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करून अहिल्यानगर जिल्ह्याचा नावलौकिक उंचवावा, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


या राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरादरम्यान गुलमोहर फुटबॉल क्लबने मैदानाच्या सुविधा उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. या सहकार्याबद्दल संघमालक झोएब खान तसेच प्रशिक्षक प्रसाद पाटोळे आणि सुभाष कनोजिया यांचे अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रसाद पाटोळे तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रियंका सूर्यवंशी जबाबदारी सांभाळत आहेत.
अहिल्यानगर जिल्हा संघ असा : राणी कदम (कर्णधार), निकिता भिंगारदिवे, सुमैय्या शेख, तनिषा शिरसुळ, पूजा भिंगारदिवे, श्रेया कावरे, वैष्णवी रोकडे, सोनिया दोसाणी, प्रियांका आवारे, सूर्य नयना, साक्षी जाधव, निकिता रामावत, शोभा गंधेर, दुर्वा गडाख, अक्षरा गोंटला आणि अश्‍विनी पाटोळे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *