अंतिम सामन्यात जळगाववर दोन षटके राखून मात; सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या सात खेळाडूंचा विजयी संघात सहभाग
संघाला विजेतेपद; उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत राज्य अजिंक्यपदाचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकाविले. उपांत्य फेरीत मुंबईच्या संघाचा पराभव केल्यानंतर अंतिम सामन्यात जळगावच्या संघावर दोन षटके राखून मात करत अहिल्यानगरच्या संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या विजयी संघात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील तब्बल सात खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगरच्या संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. उपांत्य फेरीतील सामन्यात अहिल्यानगरच्या खेळाडूंनी मुंबईच्या संघाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात जळगावच्या संघाविरुद्धही अहिल्यानगरच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. अखेर जळगावचा दोन षटके राखून पराभव करत अहिल्यानगर संघाने राज्य अजिंक्यपद पटकाविले.
संघाच्या या विजयात कर्णधार नशरा सय्यद हिचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. तिच्यासह राशी पवार, अमृता ढगे, धनश्री पवार, प्रणाली पानसंबळ, भक्ती गाडे, श्रावणी अडसुरे, आदिती ढोकणे आणि लक्ष्मीप्रिया म्हसे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अहिल्यानगरच्या विजयी कामगिरीमध्ये खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीलाही विशेष दाद मिळाली. संघाची खेळाडू राशी पवार हिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. तिच्या प्रभावी गोलंदाजीमुळे संघाला महत्त्वाच्या सामन्यांमध्ये निर्णायक फायदा झाला. तसेच अहिल्यानगरचीच अमृता ढगे हिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. फलंदाजी, गोलंदाजी तसेच सांघिक खेळातील योगदानामुळे तिने स्पर्धेत विशेष छाप पाडली.
राज्य अजिंक्यपद पटकावणाऱ्या या खेळाडूंचे सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, शिक्षण मंडळाचे सचिव महानंदजी माने, खजिनदार महेश घाडगे, विद्यालयाचे प्राचार्य अरुणजी तुपविहीरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा. जितेंद्र मेटकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी व क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के आदींनी अभिनंदन केले.
आगामी काळात उत्तर प्रदेशातील मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व विजयी खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना क्रीडाशिक्षक घनश्याम सानप तसेच एनसीसी प्रमुख संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. अहिल्यानगरच्या मुलींनी राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

