मुलींमध्ये प्रवरा व मुलांच्या गटात सेंट मायकल्स, प्रवरा अन् सेक्रेड हार्टला विजेतेपद
शंभरहून अधिक सामन्यांत खेळाडूंची चुरस, अंतिम सामन्यांमध्ये टायब्रेकरचा रोमांच
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फुटबॉलच्या मैदानावर कौशल्य, जिद्द, आक्रमकता आणि विजयासाठीची झुंज यांचा रोमांचक संगम अनुभवायला मिळाला. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये विजेतेपदासाठी संघांनी अक्षरशः जीवाचे रान केले. काही सामन्यांचा निकाल शेवटच्या क्षणापर्यंत लांबला, तर दोन अंतिम सामने टायब्रेकरपर्यंत रंगले. अखेर 16 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल, 12 वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट मायकल्स स्कूल, 14 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल आणि 16 वर्षांखालील मुलांच्या गटात सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने विजेतेपद पटकावले. विजयी संघातील खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला.
फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. यंदा स्पर्धेला संघांचा विक्रमी सहभाग लाभला. स्पर्धेदरम्यान शंभरपेक्षा अधिक फुटबॉल सामने रंगले. त्यामुळे संपूर्ण कालावधीत अहमदनगर महाविद्यालयाचे मैदान फुटबॉलमय झाले होते. विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघांना फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त तथा अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि शिवाजियन्स स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष तथा फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या हस्ते चषक देण्यात आले. खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, सचिव रौनप फर्नांडिस, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहाय्यक खजिनदार तपन परमार, कार्यकारिणी सदस्य राजेश अँथनी, फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या मुख्य आयोजन समितीच्या सदस्य पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, सचिन पाथरे, अभय साळवे, अभिषेक सोनवणे यांच्यासह शिवाजियन्स स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, प्रशिक्षक, पंच, खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विविध श्रेणीतील उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसेही प्रदान करण्यात आली.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, विद्यार्थी दशेपासूनच फुटबॉलचे खेळाडू घडावे, या उद्देशाने या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जात आहे. या स्पर्धेमुळे फुटबॉल खेळाला चालना मिळाली असून, शहरातील वातावरण फुटबॉलमय बनले आहे. ही स्पर्धा अजून शानदार होण्यासाठी मनोज वाळवेकर यांचे विशेष योगदान मिळत असून, या खेळासाठी त्यांची मोलाची साथ लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज वाळवेकर म्हणाले की, शहरातील चित्र बदलत असून, फुटबॉलची क्रेझ वाढत चालली आहे. मुलांबरोबर मुलींचे संघ देखील मोठ्या संख्येने स्पर्धेत उतरले आहे. जिल्ह्यातील मुलींचा संघ देखील आपली उत्कृष्ट कामगिरी राज्यात करत असून, या स्पर्धेतून हे खेळाडू पुढे आले असल्याचे स्पष्ट करून त्यांनी फुटबॉलची आवड असलेल्यांना फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी सहभागी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी विविध गटांत फुटबॉल विषयावर चित्रकला स्पर्धा रंगली होती. विद्यार्थ्यांनी फुटबॉलची विविध चित्रे रेखाटली. स्पर्धेदरम्यान रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रेक्षकांसह खेळाडूंनी आनंद लुटला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अभय साळवे, विल्यम राज, अभिषेक सोनवणे, साहिल कुसळकर, सोनिया दोसानी, जोएल पाथरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली क्षीरसागर यांनी केले. स्पर्धेचे समालोचन राहुल क्षीरसागर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिरोदिया शिवाजियन्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
–
अंतिम सामन्यांमध्ये असा रंगला थरार
16 वर्षांखालील मुली : प्रवरा पब्लिक स्कूल विजेता
16 वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. प्रवरा पब्लिक स्कूलकडून हेमा गावित हिने सातव्या मिनिटाला गोल करून खाते उघडले. त्यानंतर मयुरी कोल्हे हिने नवव्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढवली. प्रवरा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळ करत आर्मी पब्लिक स्कूलला एकही गोल करू दिला नाही. अखेर 2-0 गोलने प्रवरा पब्लिक स्कूलच्या मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवले. मागील वर्षी देखील या संघाने विजेतेपद पटकावले होते. यंदा पुन्हा विजेतेपद मिळवत संघाने दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. या गटात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.
12 वर्षांखालील मुलांचे गट : सेंट मायकल्स स्कूलचा दणदणीत विजय
12 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील स्कूल विरुद्ध सेंट मायकल्स स्कूल यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात 2-0 गोलने सेंट मायकल्स स्कूलने विजय मिळवला. मागील वर्षी विजेतेपद पटकावलेल्या आठरे पाटील स्कूलला यावर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सेंट मायकल्सकडून 27व्या मिनिटाला सारांश बोरा व 31व्या मिनिटाला नाविल दिवानी यांनी गोल करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. या गटात आयकॉन पब्लिक स्कूलचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.
14 वर्षांखालील मुलांचे गट : टायब्रेकरमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलचा विजय
14 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट मायकल्स स्कूल असा अंतिम सामना रंगतदार झाला. सेंट मायकल्सकडून अनिस झांजे याने 35व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर प्रवरा स्कूलकडून 39व्या मिनिटाला मोहित चौधरी याने गोल करून बरोबरी साधली. सामन्याच्या शेवटपर्यंत दोन्ही संघ 1-1 गोलने बरोबरीत राहिल्याने सामना टायब्रेकरवर घेण्यात आला. टायब्रेकरमध्ये 3-2 गोलने प्रवरा पब्लिक स्कूलने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या गटात आर्मी पब्लिक स्कूलचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.
16 वर्षांखालील मुलांचे गट : सडन डेथमध्ये सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटचा थरारक विजय
16 वर्षांखालील मुलांच्या गटात सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल असा अत्यंत अटीतटीचा सामना प्रेक्षकांना अनुभवता आला. आर्मी स्कूलकडून आदर्श द्विवेदी याने 30व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. मात्र सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात सेक्रेड हार्टकडून जोएल साठे याने गोल करून बरोबरी साधली. शेवटपर्यंत 1-1 गोलची बरोबरी राहिल्याने हा सामना टायब्रेकरवर घेण्यात आला. टायब्रेकरवरसुद्धा 3-3 गोलने बरोबरी साधली गेली. त्यानंतर सडन डेथवर सामना घेण्यात आला. पुन्हा तीनदा संधी बरोबरीत गेल्यानंतर अखेर 3-2 गोलने सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलने दणदणीत विजय मिळवला. मागील वर्षी आर्मी पब्लिक स्कूलला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. यावर्षी देखील हीच पुनरावृत्ती झाली. थोडक्यात त्यांचे विजेतेपद हुकले. या गटात आठरे पाटील स्कूलचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.
व्यक्तिगत पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे :-
12 वर्षांखालील गट : नाविल दिवानी (सेंट मायकेल्स स्कूल), प्रिन्स चंदन (प्रवरा पब्लिक स्कूल), सैराज तागड (आठरे पाटील स्कूल), अरव बजाज (आयकॉन पब्लिक स्कूल), कृषिव केशी (आठरे पाटील स्कूल).
14 वर्षांखालील गट : शौर्य चंगेडिया (सेंट मायकल स्कूल), अजय सांगळे (आर्मी पब्लिक स्कूल), रुद्र भोये (प्रवरा पब्लिक स्कूल), आदर्श साबळे (आर्मी पब्लिक स्कूल).
16 वर्षांखालील गट : लक्ष्य चौहान (गोलरक्षक, आर्मी पब्लिक स्कूल), अंशुमान विधाते (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट), रामचंद्र पालवे (प्रवरा पब्लिक स्कूल), ओम लोखंडे (आठरे पाटील स्कूल), अशोक चांद (आठरे पाटील स्कूल), अफान शेख गोलरक्षक (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट).
16 वर्षांखालील मुलींचा गट : हृदया तडके (श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल), प्रांजल काकडे (आर्मी पब्लिक स्कूल), हेमा गावित (प्रवरा पब्लिक स्कूल), काव्या झावरे (पोदार स्कूल).

