• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

स्नेहालयाच्या बालभवनातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Jan 9, 2024

भारतीय जनता पार्टी व मानवी हक्क अभियानाचा उपक्रम

स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई यांनी समाजाला प्रकाशमान केले -महेंद्र (भैय्या) गंधे

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी व मानवी हक्क अभियानाच्या वतीने रामवाडी येथे स्नेहालय संचलीत बालभवनातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंती उत्सव सप्ताहानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.


भाजपचे विधानसभा प्रमुख महेंद्र (भैय्या) गंधे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे बाबासाहेब सानप, अनुसूचित जाती मोर्चाचे माजी शहराध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, दिलीप जाधव, सुनिल सकट, पोपट भोसले, सुनिल पांडुळे, साहेबराव काते, नामदेव अडागळे, महेश भोसले, विक्रम पेटारे, बबन दिवटे, सलीमभाई मिर्झा, राजू दिवटे, अशोक उमाप, बालभवनच्या शिक्षिका जयश्री शिंदे, आशा शेख आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.


महेंद्र (भैय्या) गंधे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्री मुक्तीची चळवळ चालवली. मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी खुले केले. त्यांनी दिलेल्या योगदानाने आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई यांनी समाजाला प्रकाशमान केले. तर महिलांच्या हाती क्रांतीची लेखणी देऊन त्यांनी सर्वांचे जीवन समृध्द केल्याचे त्यांनी सांगितले.


अशोक भोसले म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला. त्यांनी खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची बीजे रोवली. आजची स्त्री त्यांच्या त्यागाने व कार्याने सक्षम बनली असल्याचे त्यांनी सांगितले.रंजना जाधव, कल्याणी भोसले, हर्षदा वाघचौरे, अनुष्का जाधव या विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणातून प्रकाश टाकला तर त्यांचे स्त्री शिक्षणाच्या महान कार्याची माहिती दिली. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी मध्य मंडलाध्यक्ष व मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष अशोक भोसले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *