सलग तिसऱ्या वर्षी अहिल्यानगरचे प्रतिनिधित्व; पहिला सामना स्पोर्टिंग क्लब द ठाणे संघाविरुद्ध
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) आयोजित महाराष्ट्र राज्य युवा फुटबॉल लीग 2026-27 स्पर्धेसाठी फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीचा 15 वर्षांखालील मुलांचा संघ नुकतेच शिरपूर (जि. धुळे) येथे रवाना होत आहे.
स्पर्धेचा पहिला टप्पा 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणार असून फिरोदिया शिवाजियन्सचा पहिला सामना स्पोर्टिंग क्लब द ठाणे संघाविरुद्ध होणार आहे. दोन टप्प्यांत संघ एकूण 10 सामने खेळणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित फुटबॉल क्लब आणि अकॅडमी सहभागी होत आहेत.
त्यामध्ये डिसोझा फुटबॉल अकॅडमी मुंबई, स्पोर्टिंग क्लब द ठाणे, डेरवण एफसी, वसई विरार युनायटेड फुटबॉल असोसिएशन, स्टेपओव्हर फुटबॉल अकॅडमी, एसव्हीकेएम स्पोर्ट्स अकॅडमी धुळे, साऊथ वेस्ट ब्ल्यू नागपूर, ध्रुव युनायटेड नाशिक आणि एसजी 5 फुटबॉल क्लब हिंगोली यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी फुटबॉल विकास प्रकल्प ‘प्रोजेक्ट महादेवा’ हे देखील या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. फिरोदिया शिवाजियन्स सलग तिसऱ्या वर्षी या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय लीगमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
फिरोदिया शिवाजियन्स संघात हर्षद सोनावणे (कर्णधार), सम्राट आव्हाड (उपकर्णधार), शौर्य मोरे, शौर्य चंगेडिया, भार्गव साळुंखे, संकेत गव्हाणे, श्रेयांक पांडे, अर्णव सप्तर्षी, सोहम हिंगे, तनिश पडागळे, अर्णव चव्हाण, धनुष धांडे, अर्णव जोशीलकर, अभिषेक सासणे, पार्थ ताठे, अनमोल काळे यांचा समावेश आहे.
संघासोबत प्रशिक्षक जेव्हिअर स्वामी आणि व्यवस्थापक व फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रियदर्शिनी सूर्यवंशी असणार आहेत. या स्पर्धेसाठी संघाच्या तयारीत मुख्य प्रशिक्षक जॉर्डन फर्नांडिस तसेच क्लब कमिटी सदस्य पल्लवी सैदाणे, अभिषेक सोनवणे, राजेश अँथनी आणि सचिन पात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
राज्यातील उत्कृष्ट संघांशी सामना करण्याची संधी आपल्या खेळाडूंसाठी महत्त्वाची आहे. या अनुभवातून भविष्यात आणखी चांगले फुटबॉलपटू घडतील, असा विश्वास क्लबचे सहमालक नरेंद्र फिरोदिया आणि मनोज वाळवेकर यांनी व्यक्त करुन संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

