गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अहिल्यानगरात आनंदाने बाप्पाचा जयघोष
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम; गणेशोत्सवात नेत्रदान-अवयवदान
जनजागृतीचे देखावे सादर करण्याचे मंडळांना आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोषामुळे अंधुक झालेल्या आयुष्यात पुन्हा प्रकाश निर्माण करण्याच्या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून 67 ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाली. पुणे येथील रुग्णालयात या ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. गणरायाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला नवदृष्टी घेऊन अहिल्यानगरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष करत आनंद व्यक्त केला.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. शस्त्रक्रियेनंतर स्पष्ट दिसू लागल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. गणेशोत्सवाच्या प्रारंभीच आयुष्यातील अंधुकपणा दूर होऊन दृष्टीचा अनमोल प्रकाश मिळाल्याने हा दिवस या ज्येष्ठांसाठी विशेष आणि अविस्मरणीय ठरला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दृष्टीदोष व मोतीबिंदूग्रस्त रुग्णांना उपचार मिळावेत, या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनने जिल्ह्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियांची चळवळ उभी केली आहे. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, राष्ट्रीय सण तसेच विविध उत्सवांचे औचित्य साधून संस्थेच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांमध्ये तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे आढळते, अशा रुग्णांना पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येते. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे शक्य नसलेल्या रुग्णांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळत आहे.
मोतीबिंदूमुळे दृष्टी कमी झाल्याने दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर पुन्हा स्पष्ट दिसू लागल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या आत्मविश्वासात वाढ होत आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ उपचारापुरता मर्यादित न राहता ज्येष्ठांच्या स्वावलंबनाला आणि आत्मविश्वासालाही बळ देणारा ठरत असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू घटकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने फिनिक्स सोशल फाऊंडेशनकडून सातत्याने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. दर महिन्याला गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. मोतीबिंदूग्रस्त रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचारांसाठी त्यांना पुढील सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नागरिकांना महागड्या उपचारांचा आर्थिक भार सहन न करता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घेता यावी, यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांसाठी ही आरोग्यसेवा आधारवड ठरत आहे. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या नेत्रविषयक उपक्रमातून केवळ मोतीबिंदूच्या उपचारांवर भर दिला जात नसून नेत्रदान आणि अवयवदानाबाबतही जनजागृती केली जात आहे. मृत्यूनंतरही आपले डोळे आणि अवयव दान करून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. शासनाच्या अवयवदान सप्ताहाच्या निमित्तानेही याबाबत जनजागृती करण्यात आली. समाजातील नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले.
–
गणेश मंडळांनी नेत्रदान-अवयवदानावर देखावे सादर करावेत
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांनी यंदाच्या उत्सवात नेत्रदान व अवयवदान या विषयांवर जनजागृतीपर देखावे सादर करावेत, असे आवाहन फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. कोणताही अवयव कृत्रिमरीत्या तयार होत नसल्याने गरजू रुग्णांचे जीवन वाचविण्यासाठी एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या अवयवदानावर अवलंबून राहावे लागते. भारतात अवयवदानाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने अनेक गरजू रुग्णांना अवयवासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. वेळेवर अवयव उपलब्ध झाल्यास एखाद्या व्यक्तीला नवजीवन मिळू शकते, यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.
–—

