• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रीय अभियंता दिन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वृक्षारोपणाने साजरा

ByMirror

Sep 15, 2026
अभियंत्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण

अभियंत्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण


विकासाची वाटचाल पर्यावरणाचा समतोल राखूनच झाली पाहिजे -संजय सपकाळ


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय अभियंता दिन वृक्षारोपण करून सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरा करण्यात आला. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये अभियंता दिनाचे औचित्य साधून अभियंत्यांच्या हस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली. सामाजिक बांधिलकीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला ग्रुपच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या वेळी इंजि. नागेश खुरपे व इंजि. अनिलराव सोळसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून भिंगार परिसरातील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कच्या स्वच्छता, वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच मोठ्या प्रमाणात झाडांची निगा राखण्याचे काम ग्रुपचे सदस्य सातत्याने करत आहेत. त्यामुळे जॉगिंग पार्क हे नागरिकांसाठी आरोग्यदायी व हिरवाईने नटलेले ठिकाण म्हणून विकसित होत आहे.


यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, ताराचंद ठोकळ, अशोक पराते, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, दिलीप ठोकळ, अशोक लोंढे, रूपालीताई खुरपे, सविताताई परदेशी, प्रांजली सपकाळ, प्रवीण परदेशी, विलास आहेर, सुंदरराव पाटील, सखाराम अळकुटे, योगेश चौधरी, अभिजीत सपकाळ, सुभाषराव पेंढुरकर, मुन्ना वाघस्कर, अविनाश जाधव, सुधीर कपाळे, सरदारसिंग परदेशी, जोगिंदरसिंग, उमाशंकरसिंग, दिपकराव घोडके, तुषार घाडगे, आजेशे पुरी आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, “अभियंते हे देशाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. रस्ते, पूल, इमारती, जलव्यवस्था, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत अभियंत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र विकासाची ही वाटचाल पर्यावरणाचा समतोल राखूनच झाली पाहिजे. म्हणूनच हरदिन मॉर्निंग ग्रुपने अभियंता दिन वृक्षारोपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. एक झाड लावणे ही केवळ औपचारिकता नसून त्याचे संगोपन करणे ही खरी पर्यावरणसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.


इंजि. नागेश खुरपे म्हणाले की, “अभियंता दिन हा अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. आधुनिक भारताच्या उभारणीत अभियंत्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण मोठी प्रगती साधत आहोत; परंतु या प्रगतीसोबत पर्यावरणाचे संरक्षण करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
इंजि. अनिलराव सोळसे म्हणाले की, “अभियांत्रिकी क्षेत्रात काम करताना नियोजन, अचूकता आणि दीर्घकालीन विचार यांना महत्त्व असते. पर्यावरण संवर्धनालाही याच दृष्टिकोनाची गरज आहे. आज एक रोप लावून आपले काम संपत नाही, तर त्याचे संगोपन करून ते मोठे झाड होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. शहराचा विकास होत असताना वाढती लोकसंख्या, काँक्रिटीकरण आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणावर मोठा ताण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे त्यांनी आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *