• Thu. Oct 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथील अमरधाम परिसरात स्वच्छता अभियान

ByMirror

Oct 8, 2026
‘स्वच्छ गाव, सुंदर परिसर’चा संदेश

पालापाचोळा, गवत व काटेरी झाडे हटवून परिसर केला स्वच्छ


‘स्वच्छ गाव, सुंदर परिसर’चा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील अमरधाम परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.


या अभियानाच्या माध्यमातून अमरधाम परिसराची साफसफाई करण्यात आली. परिसरात साचलेला झाडांचा पालापाचोळा, गवत तसेच वाढलेली काटेरी झाडे बाजूला करून परिसर स्वच्छ करण्यात आला. अमरधामसारख्या सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता आणि देखभाल होणे आवश्‍यक असून, त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले. स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिन काळे, मयूर काळे, नितीन काळे, पवन काळे आदी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून अमरधाम परिसर स्वच्छ केला.


यावेळी पै. नाना डोंगरे म्हणाले की, अमरधाम हा आपल्या गावातील महत्त्वाचा सार्वजनिक परिसर आहे. या परिसराची स्वच्छता आणि देखभाल करणे ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छ राहिल्यास नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश जातो. “स्वच्छता ही एक दिवसाची मोहीम न राहता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, झाडे व परिसराचे संरक्षण करावे आणि आपल्या गावाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *