• Sun. Nov 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात 24 नोव्हेंबरला नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन; साहित्यिक-कवींची मांदियाळी रंगणार!

ByMirror

Nov 15, 2026
निमगाव वाघात 24 नोव्हेंबरला नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

दुष्काळावर कविता लेखन स्पर्धेचे बक्षिस वितरण; तर कर्तृत्ववान महिलांचा विशेष पुरस्काराने होणार गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी आणि नवोदित प्रतिभावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने निमगाव वाघा (ता. नगर) येथे मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक सीए शंकर अंदानी उपस्थित राहणार असून, पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके भूषविणार आहेत. तर कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील लेखिका प्रा. आश्विनी काळे राहणार आहेत. या सोहळ्यास राज्यभरातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.


साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी निमगाव वाघा गावातून भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत बाल वारकरी, साहित्यिक, कवी आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. पारंपरिक वातावरणात निघणाऱ्या या ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून ग्रंथांचे महत्त्व, वाचनाची आवड आणि साहित्य संस्कृतीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.


या संमेलनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कविता लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळाही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
संमेलनादरम्यान ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंतांच्या उपस्थितीत विविध विषयांवर परिसंवाद व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, समाज, संस्कृती, ग्रामीण जीवन आणि वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.


संमेलनाच्या मध्य सत्रात निमंत्रित कवींचे कवी संमेलन रंगणार असून, विविध भागांतून आलेले कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. ग्रामीण भागातील नवोदित कवी आणि साहित्यिकांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे. तर शिवशाहीर सुनिल चिंचोलीकर (ता. नेवासा) यांचे पोवाड्याचे सादरीकरण होणार आहे. वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि ग्रामीण भागातील नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी संमेलनस्थळी ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ विक्रीचेही आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमींना विविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांची ओळख करून घेण्याची तसेच आवडीची पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला बळ देणारे आणि नव्या पिढीला साहित्याशी जोडणारे हे संमेलन ठरणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *