• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

अंधारलेल्या आयुष्यांना आनंदऋषी नेत्रालय देत आहे, जीवनात प्रकाश -सुरेंद्र लोढा

ByMirror

Mar 30, 2026
आय बँक सुरू करण्याचा पुढाकार; 5 जिल्ह्यात 22 व्हिजन सेंटर कार्यरत

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्र तपासणी शिबिरात 445 रुग्णांची मोफत तपासणी


आय बँक सुरू करण्याचा पुढाकार; 5 जिल्ह्यात 22 व्हिजन सेंटर कार्यरत

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना नवजीवन देण्याचे आणि नेत्र विभागाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. अंधारलेल्या आयुष्यांना, जीवनात प्रकाश निर्माण होत असून, या हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे आरोग्यसेवेचे मंदिरच आधार ठरले आहे, असे प्रतिपादन सुरेंद्र लोढा यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त, संथाराव्रतधारी श्रीमती जयकुंवरबाई मोतीलालजी लोढा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोढा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सविता लोढा, सुजाता लोढा, हेमा लोढा, मनिषा लोढा, देव लोढा, शोभा लोढा, अनिता लोढा, संजना लोढा, स्मिता लोढा, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, प्रकाश छल्लाणी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, नेत्र तज्ञ डॉ. अशोक महाडिक, डॉ. संदिप राणे, डॉ. प्रतिक कटारिया, डॉ. किरण शिंदे, डॉ. ऋषीकेश ठेरले आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलचा नेत्रालय विभाग अंधारलेल्या व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य सातत्याने करत आहे. सुसज्ज नेत्र विभाग व तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून दररोज शंभरपेक्षा जास्त डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होत आहेत. या नेत्रालयाने राज्यभरात रुग्णांचा मोठा विश्‍वास संपादन केला असून, मराठवाडा भागातील गरजू रुग्ण मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांत नेत्रालय विभागाची 22 व्हिजन सेंटर कार्यरत असून ग्रामीण भागात दारोदारी सेवा पोहोचवली जात आहे. तारकपूर येथे नव्याने नेत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला असून पुढील टप्प्यात आय बँक सुरू करण्याचे स्वप्न साकार करण्यात येणार आहे. नेत्रदानाच्या माध्यमातून अनेकांचे अंधत्व दूर करण्यासाठी हॉस्पिटल प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यात लोढा परिवाराचे मोलाचे योगदान लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


डॉ. वसंत कटारिया यांनी लोढा परिवाराची माहिती देताना सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात हा परिवार सक्रियपणे सहभागी झाला आहे. निखील लोढा जबाबदारीने व मनापासून काम करत असून, हा परिवार सेवाभावी व धार्मिक वृत्तीचा आहे. त्यांच्या योगदानामुळे नेत्र विभागाला अल्पावधीत मोठे यश मिळाले आहे.


संतोष बोथरा म्हणाले की, ग्रामीण भागातील दृष्टीदोष असलेल्या रुग्णांच्या वाडी-वस्तीवर जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये आणणे, शस्त्रक्रिया करून पुन्हा घरी सोडणे, असे कार्य सातत्याने केले जात आहे. हे कार्य एका मिशनप्रमाणे राबविले जात असून, राज्यात अग्रेसर असलेल्या संस्थांमध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटलचा समावेश होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. प्रतिक कटारिया यांनी सांगितले की, तारकपूर येथे सुसज्ज नेत्र विभाग सुरू करण्यात आला असून, उपनगरातील नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांची सोय करण्यात आली आहे. या विभागात अवघ्या पाच महिन्यांत 5 हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली. संजना लोढा यांनी डॉक्टर, कर्मचारी व सर्व विश्‍वस्तांच्या सेवाभावी कार्यामुळे हे आरोग्य मंदिर उभे राहिले असल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले.


या शिबिरात एकूण 445 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यामधील गरजू रुग्णांवर अल्पदरात मोतीबिंदू, काचबिंदू आदी नेत्रदोषांवरील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *