• Tue. Oct 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

मतदारांच्या हक्कांसाठी रिपाइंचे साखळी उपोषण पाचव्या दिवशीही सुरू; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

ByMirror

Oct 13, 2026
एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी तीव्र

मार्केटयार्ड चौकात रात्रीही आंदोलनाचा आवाज घुमतोय! पोवाडे, देशभक्तीपर गीतांतून एसआयआरविरोधात एल्गार


एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी तीव्र


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि मतदारांच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर) रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरात साखळी उपोषण सुरू आहे. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाचा मंगळवारी (दि. 13 ऑक्टोबर) पाचवा दिवस होता.


मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. दिवसभर सुरू असलेले आंदोलन रात्रीदेखील सुरू असून, घोषणांच्या आवाजाने परिसर दणाणून जात आहे. पोवाडे, देशभक्तीपर गीते आणि स्फूर्तिगीतांच्या माध्यमातून आंदोलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.


मतदार यादीतील कथित त्रुटी आणि पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या या आंदोलनाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका रिपाइंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (एसआयआर) विरोध दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाने ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. मतदार यादी अद्ययावत करताना पात्र नागरिकांची नावे चुकीने वगळली गेल्यास संबंधित नागरिक मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहू शकतात, अशी चिंता आंदोलकांनी व्यक्त केली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाची संधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मतदार यादी तयार करण्यापासून तिच्या पुनरीक्षणापर्यंतच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाऊ नये आणि नागरिकांना आपली नावे तपासण्याची पुरेशी संधी मिळावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
तसेच मतदार यादीतील नावांबाबत काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे आणि पुनरीक्षण प्रक्रियेमुळे पात्र मतदारांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होणार नाही, याची खात्री करण्यात यावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.


या साखळी उपोषणात रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलाम शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, नईम शेख, विल्सन रुकडीकर, स्वप्नील साठे, राहुल ठोकळ, अझीझ शेख, शुभम दारकुंडे, जालिंदर कानडे, लकी वाघमारे, अरबाज शेख, जमीर सय्यद, जावेद शेख, आयन शेख, नजीर देशमुख, पीटर लोंढे, फयाज शेख, तौसिफ शेख, जावेद सय्यद, फारूक शेख, प्रशांत आठवले, योहान चाबुकस्वार आणि चिकू गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. महिला आघाडीच्या ज्योती पवार, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, विश्रांती पठारे, प्रियंका पठारे, शीतल नाटिकर, रेश्‍मा जाधव आणि प्रमिला शिरसाठ यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला आहे. याशिवाय समविचारी पक्ष आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *