आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व गर्भवती महिला तपासणी शिबिर; 110 महिलांची तपासणी
विविध उपचार व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये वर्षभर विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा जपला जात आहे. स्त्री निरोगी राहिल्यास कुटुंब आणि समाज निरोगी राहतो, ही जाणीव आता समाजाला झाली आहे. सशक्त समाज आणि सशक्त कुटुंबासाठी स्त्रीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. केंद्र व राज्य सरकारदेखील यासाठी योगदान देत आहे. सशक्त पिढी निर्माण करण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्य चळवळ हातभार लावत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) मराठवाडा मित्र मंडळ व मान कन्हैय्या ट्रस्ट आयोजित स्त्रीरोग व गर्भवती महिला मोफत तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आनंद भंडारी बोलत होते. यावेळी मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, मान कन्हैय्या ट्रस्टच्या डॉ. सुधा कांकरिया, सौ. डॉ. स्मिता आनंद भंडारी, मराठवाडा मित्र मंडळाचे सचिव नंदकुमार देशपांडे, कार्याध्यक्ष सदाशिवराव मोहिते, मनोहर कटके, पुरुषोत्तम दरबस्तवार, संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, निखिल लोढा, सतीश लोढा, अभय गुगळे, मानकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, सुनील मालू, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र मुथा, डॉ. तृप्ती पाटील, डॉ. प्रथमेश झेंडे आदींसह मराठवाडा मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आनंद भंडारी पुढे म्हणाले की, माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. कुपोषणावर मात करण्यासाठीदेखील विशेष प्रकल्प सुरू आहे. मराठवाडा मुक्ती दिनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या ऐतिहासिक घटनेला 78 वर्षे पूर्ण झाली आहेत. 17 सप्टेंबर 1948 या दिवसाची आठवण म्हणून मराठवाडा मित्र मंडळाने घेतलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले की, मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी बालएकांकिका स्पर्धादेखील घेण्यात आली. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा विशेष उपक्रम सुरू आहे. आनंद भंडारी हे नगरचे जावई असून त्यांच्या पत्नी डॉक्टर या अहिल्यानगरच्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
संतोष बोथरा म्हणाले की, जिल्हा परिषदेत आनंद भंडारी यांच्या माध्यमातून कार्यक्षम अधिकारी मिळाला आहे. सर्व यंत्रणा उत्तम चालते. जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिक गेला तरी त्याचे काम होते, हेच त्यांच्या कामाची पावती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. तृप्ती पाटील म्हणाल्या की, महिलांच्या समस्या अनेक असतात; मात्र त्या अनेकदा त्या अंगावर काढतात. त्यामुळे भविष्यात अनेक आजारांचा धोका संभवतो. वेळीच निदान करणे महत्त्वाचे आहे. मासिक पाळीचे प्रश्न, गर्भपिशवीचे प्रश्न यांसह सर्व सुविधा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. तसेच महिला गर्भवती राहिल्यानंतर त्यांची डिलिव्हरी आणि सुदृढ बालकाचे आरोग्य याकडेदेखील विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व उपचार, विविध शस्त्रक्रिया व तपासण्या अल्पदरात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. डॉ. सुधा कांकरिया यांनी स्त्री जन्माचे स्वागत करण्याची प्रतिज्ञा सर्व उपस्थित पाहुणे तसेच हॉस्पिटलमधील सर्व रुग्ण व नातेवाईकांना दिली. या शिबिरात एकूण 110 महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली. दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, सिजेरियन, नॉर्मल डिलिव्हरी, दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढणे, हिस्टरीजिओग्राफी, गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींची तपासणी तसेच गर्भवती स्त्रियांच्या सर्व चाचण्या सवलतीच्या दरात करण्यात आल्या.
गर्भवती महिलांसाठी आहाराचा सल्ला तसेच घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एमआरआय व सीटी स्कॅनची सुविधादेखील सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली. या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच वेळेत निदान व उपचार मिळण्यासाठी शिबिराचा लाभ महिलांना मिळाला.

