अतुल देव्हारे यांच्या पाठपुराव्याला यश; गरजू रुग्णांसाठी मोठी सुविधा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय तपासणीची सुविधा शासकीय रुग्णालयातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहराध्यक्ष अतुल देव्हारे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. अहिल्यानगर जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआरआय (MRI) मशीन कार्यान्वित करण्यात आली असून, ही सुविधा नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआरआय तपासणीची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना खासगी रुग्णालये किंवा निदान केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करावी लागत होती. त्यामुळे एमआरआय तपासणीसाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने गरीब व गरजू रुग्णांवर आर्थिक भार पडत होता. ही अडचण लक्षात घेऊन अतुल देव्हारे यांनी जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला.
या मागणीसाठी देव्हारे यांनी आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्याशी दूरध्वनी तसेच ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधला. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, शासकीय रुग्णालयावर असलेला रुग्णसेवेचा मोठा भार आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी आर्थिक अडचण याकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या पाठपुराव्यातून सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली एमआरआय मशीन अहिल्यानगर जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आली. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी खासगी केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
एमआरआय ही विविध आजार व शारीरिक समस्यांचे निदान करण्यासाठी महत्त्वाची तपासणी मानली जाते. मेंदू, मणका, सांधे, स्नायू तसेच शरीरातील विविध अवयवांशी संबंधित आजारांच्या निदानासाठी या तपासणीचा उपयोग होतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात ही सुविधा सुरू झाल्याने रुग्णांना उपचार प्रक्रियेत मोठी मदत मिळणार आहे. शासकीय रुग्णालयातच एमआरआयची सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवरील खासगी तपासण्यांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उपचारासाठी अहिल्यानगर शहरात येणाऱ्या रुग्णांसाठीही ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल अतुल देव्हारे यांनी आमदार संग्राम जगताप तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बबनराव घोलप यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.

