आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग व थॅलेसेमिया तपासणी शिबिरात बालकांची मोफत तपासणी
91 बालकांची मोफत आरोग्य तपासणी; दर महिन्याला 210 थॅलेसेमियाग्रस्त बालकांवर मोफत उपचार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निरोगी व सदृढ समाजाचे मिशन घेऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सातत्याने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम सुरू आहे. बालकांचे विविध आजार व आरोग्य तपासण्या एका छताखाली उपलब्ध करून देत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचे वसंतलाल चोपडा यांनी सांगितले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने स्व. विलास वसंतलाल चोपडा यांच्या स्मरणार्थ वसंतलाल चुनीलालजी चोपडा परिवाराच्या वतीने बालरोग व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी वसंतलाल चोपडा बोलत होते. यावेळी सुभाष मुनोत, अलका मुनोत, संतोष बोथरा, प्रकाश छल्लाणी, सतीश लोढा, डॉ. वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, बालरोग तज्ज्ञ डॉ. निखिल गुट्टे, डॉ. वैभवी वंजारे, डॉ. दिपी अग्रवाल, डॉ. लिझा बलसारा, डॉ. रुपेश सिकची आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आरोग्य सेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटल समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहे. मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजाच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजाची सेवा करत हॉस्पिटलने सर्वसामान्यांच्या मनात मोठा विश्वास निर्माण केला आहे.
संपूर्ण राज्यातून रुग्ण आरोग्यसेवेसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येतात. या सेवा कार्यात वसंतलाल चोपडा आणि सुभाष मुनोत परिवाराचे मोठे योगदान मिळत आहे. जैन सोशल फेडरेशनच्या खांद्याला खांदा लावून ते कार्य करत असून, जीवनाचा खरा आनंद आरोग्य सेवेतून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दर महिन्याला थॅलेसेमियाग्रस्त 210 बालकांना मोफत उपचार दिले जात असून, बालकांच्या विविध आजारांवरील उपचार सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याची माहितीही संतोष बोथरा यांनी दिली.
डॉ. लिझा बलसारा म्हणाल्या की, थॅलेसेमिया ग्रस्त बालकांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार सुविधा उपलब्ध आहे. इतर आजारांसाठी अल्पदरात विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांटही यशस्वी करण्यात आले असून, संबंधित बालक निरोगी जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले.
बालरोग तज्ज्ञ डॉ. निखिल गुट्टे यांनी जन्मजात कमी वजनाच्या बालकांसाठी एनआयसीयू सेंटरमध्ये विशेष काळजी घेतली जाते. अशा बालकांची योग्य निगा राखून त्यांची उत्तम प्रकारे वाढ केली जाते. जिल्ह्यात सर्व सुविधायुक्त एनआयसीयू सेंटर आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. वैभवी वंजारे म्हणाल्या की, मागील 17 वर्षांपासून सेवा देत असताना बालकांच्या आरोग्यासाठी आरोग्य यंत्रणेत सातत्याने अपडेट करून नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा प्रयत्न राहिला आहे. बालकांसाठी सकस आहार तसेच मोबाईल ॲडिक्शनच्या समस्यांबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाते. सर्व प्रकारच्या लसीकरणाची सुविधा अल्पदरात उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
या मोफत बालरोग तपासणी शिबिराला नागरिक व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एकूण 91 बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ बालरोग डॉक्टरांनी बालकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश छल्लाणी यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.

