• Tue. Oct 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

सेफ ट्री इंडस्ट्रीजच्या वतीने सहावा वर्धापन दिन आर्थिक साक्षरतेने साजरा

ByMirror

Oct 13, 2026
शेअर मार्केट, गुंतवणूक आणि उद्योगविश्‍वातील बदलत्या प्रवाहांवर मार्गदर्शन

शेअर मार्केट, गुंतवणूक आणि उद्योगविश्‍वातील बदलत्या प्रवाहांवर मार्गदर्शन


भारतासारख्या देशात कंपन्यांची आणि व्यापक आर्थिक सहभागाची आवश्‍यकता -डॉ. सर्जेराव निमसे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सेफ ट्री इंडस्ट्रीज लिमिटेडचा सहावा वर्धापन दिन सोहळा आर्थिक साक्षरतेचा संदेश देत उत्साहात पार पडला. नगर-कल्याण रोड येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे होते. या सोहळ्यात मार्केटिंग चेन, शेअर मार्केटमधील गुंतवणूक, उद्योगविश्‍वातील बदलते प्रवाह, आर्थिक नियोजन आणि सहकाराच्या माध्यमातून विकास साधण्याच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सचिन राणे आणि शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध अडसूळ उपस्थित होते. सेफ ट्री इंडस्ट्रीजचे चेअरमन परशुराम कोतकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. उज्ज्वला सूर्यवंशी आणि सौ. सुषमा येठेकर यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा. सुभाष झिंजुर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर उपाध्यक्ष पारुनाथ ढोकळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.


उद्योजक सचिन राणे यांनी आपल्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीचे विविध बारकावे स्पष्ट केले. गुंतवणूक करताना कोणत्या बाबींचा विचार करावा, बाजारातील घडामोडी समजून घेण्याचे महत्त्व काय आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, याविषयी त्यांनी माहिती दिली. आर्थिक निर्णय घेताना अभ्यास, योग्य माहिती आणि नियोजन यांना महत्त्व देण्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध अडसूळ यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभव मांडताना, “सर्वांच्या प्रगतीत आपली प्रगती सामावलेली असते,” असे प्रतिपादन केले. उद्योगक्षेत्रात मोठे कार्य उभे करण्यासाठी सातत्य, संयम आणि दूरदृष्टी आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. सेफ ट्री इंडस्ट्रीजने अहिल्यानगरच्या उद्योगविश्‍वात एक नवा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. दोन विद्यार्थ्यांपासून घरोघरी जाऊन शिकवणी घेण्यास सुरुवात करून महाविद्यालय उभारण्यापर्यंतचा शैक्षणिक प्रवास त्यांनी उदाहरणादाखल मांडला. कोणताही व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच नफा मिळेलच असे नाही. एखादे काम उठून दिसण्यासाठी आणि त्याचा विस्तार होण्यासाठी अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागतात. साधारणतः दहा वर्षांचा कालावधीही महत्त्वाचा ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. सेफ ट्री इंडस्ट्रीजने अधिकाधिक भागधारक जोडण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच भागधारक वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या दृष्टीने विचार करावा, अशी सूचनाही अडसूळ यांनी केली.


कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे यांनी भारतासारख्या देशात कंपन्यांची आणि व्यापक आर्थिक सहभागाची आवश्‍यकता अधोरेखित केली. अर्थव्यवस्थेतील संपत्ती व आर्थिक संधी काही मोजक्या लोकांपुरत्या मर्यादित राहिल्यास गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सर्वसामान्यांचा सहभाग वाढणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
सहकाराच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याची संधी उपलब्ध झाली. मात्र, सहकार चळवळीचा प्रभाव कमी होताना दिसत असून, या चळवळीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील काही नामांकित कंपन्यांमध्ये भागधारक हेच मालकीचे महत्त्वाचे घटक असतात, याकडे लक्ष वेधत त्यांनी भागधारकांची भूमिका स्पष्ट केली. उद्योगक्षेत्राचा विकास करताना आर्थिक सहभाग, सहकार आणि व्यापक लोकसहभाग यांना महत्त्व दिले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.


या वेळी प्रा. संगीता निंबाळकर, ॲड. महेश शिंदे, नगरसेवक दत्ता गाडळकर, सचिव प्रा. मनोहर गोबरे, प्रा. भगवान काटे आणि राजेंद्र गुंड यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आर्थिक साक्षरता, उद्योगवाढ आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला संतोष कार्ले, संतोष कोरडे, बाळासाहेब आंधळे, एम.डी. पर्वतराव हराळ मेजर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विजय कांडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शिवाजी वेताळ मेजर यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *