• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज स्मृतिदिनी मोफत पशू आरोग्य शिबिर; 148 जनावरांची तपासणी

ByMirror

Mar 28, 2026
आचार्यजींच्या विचाराने पशुसेवेचे कार्य प्रेरणादायी -आनंद भंडारी

आचार्यजींच्या विचाराने पशुसेवेचे कार्य प्रेरणादायी -आनंद भंडारी


जायंट्‌स ग्रुप व पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार; 29 व्या वर्षीही उपक्रमाची परंपरा कायम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. 28 मार्च) जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पशू आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 148 जनावरांची तपासणी करून आवश्‍यक लसीकरण व औषधोपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, या उपक्रमाचे हे सलग 29 वे वर्ष ठरले.


नगर-पुणे महामार्गावरील जुने बस स्थानकाजवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते पार पडले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.


यावेळी डॉ. उमेश पाटील यांनी “पशुसेवा हीच ईश्‍वर सेवा” असल्याचे सांगत मुक्या प्राण्यांप्रती दयाभाव ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, पशुपक्षी आपल्या भावना त्यांच्या वेगळ्या भाषेतून व्यक्त करतात. त्यांच्या वेदना समजून घेऊन पशुवैद्यक त्यांच्यावर विविध प्रकारचे उपचार करतात. त्यामुळे मुक्या प्राण्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून संवेदनशीलतेने त्यांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आपल्या मनोगतात आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, आचार्यजींनी संपूर्ण आयुष्यभर क्षमा, शांती आणि संयम या तत्वांचा पुरस्कार केला. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण स्वतः या शहरात उपस्थित होतो, असे सांगत आचार्यजींनी प्राणीमात्रांवर दया करण्याचा संदेश दिला, त्यांच्या विचाराने हे पशुसेवेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो. जायंट्‌ससारख्या सामाजिक संस्थांमुळे समाजाची जडणघडण होत असून, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. मुकुंद राजळे यांनी जायंट्‌स ग्रुपतर्फे सातत्याने आयोजित केले जाणारे हे शिबिर अत्यंत दिशादर्शक असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, जनावरांना बोलता येत नसल्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान करणे हे अवघड असते. त्यामुळे अशा शिबिरांद्वारे त्यांच्या आरोग्याची तपासणी व उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जायंट्‌स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांनी सांगितले की, या शिबिराचे यंदा 29 वे वर्ष आहे. या उपक्रमात गाय, बैल, घोडे, कुत्रे, शेळ्या आणि मांजरांसाठी अँटी-रेबीज व धनुर्वात लसीकरण तसेच जंतनाशक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. अजय मेडिकलतर्फे सातत्याने औषध पुरवठा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.


शिबिरात डॉ. मुकुंद राजळे, डॉ. ज्ञानेश्‍वर काळे, डॉ. दशरथ दिघे, डॉ. गणेश गव्हाणे, डॉ. निमसे, डॉ. कार्तिक शिंगटे, डॉ. सुधाकर गिते, मानस चिंताबर, आकाश चोपडे, डॉ. तुषार घुले, नीता गरकल, डॉ. प्रणव गडाख आणि कांचन कवडे यांनी तपासणी व उपचार केले.


स्मृतिदिनानिमित्त जायंट्‌स ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. पांजरपोळ गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले, व्हीआरडी येथील महानुभव आश्रमात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच आनंदधाम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी दिली.
या शिबिरासाठी वीरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड व इंटास कंपनी यांनी मोफत औषधांचा पुरवठा केला. यावेळी कंपन्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर जाधव, समीर वाकोडे, प्रशांत मुठे आणि अविनाश घोलप यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला जायंट्‌स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, अजय मेडिकलचे संचालक दर्शन गुगळे, नूतन गुगळे, माजी अध्यक्ष अनिल गांधी, दीपक मुथा, सौ. अनिता मुथा, अभय मुथा, अमित धोका तसेच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांधी यांनी केले, तर आभार अमित मुनोत यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *