• Tue. Oct 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

नवरात्रोत्सवात निमगाव वाघात रांगोळीतून स्वच्छतेचा जागर!

ByMirror

Oct 20, 2026
स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या रांगोळ्यांनी वेधले भाविकांचे लक्ष

जिल्हा परिषदेच्या ‘नवरात्री स्वच्छता उत्सवा’अंतर्गत सामाजिक प्रबोधन


स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या रांगोळ्यांनी वेधले भाविकांचे लक्ष


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सव आणि विजयादशमीचे औचित्य साधून रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. रंगीबेरंगी रांगोळ्यांतून सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि स्वच्छ गावाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमामुळे धार्मिक उत्सवाला सामाजिक जाणीवेची जोड देऊन दर्शनासाठी आलेल्या भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.


जिल्हा परिषदेच्या ‘नवरात्री स्वच्छता उत्सव’ या उपक्रमांतर्गत स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. विजयादशमीनिमित्त गावातील खंडोबा मंदिराच्या सभामंडपात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या विविध आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या.
या रांगोळ्यांमधून ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’, ‘स्वच्छतेतून आरोग्य, स्वच्छतेतून समृद्धी’ यांसारखे संदेश देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे, परिसर अस्वच्छ होऊ न देणे आणि स्वच्छतेच्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारणे, यांचे महत्त्व या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले. धार्मिक स्थळावर येणाऱ्या भाविकांचा या रांगोळ्यांनी लक्ष वेधले.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम पार पडला. युवती दिपाली अंधारे हिने स्वच्छतेचे विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या. कलात्मकतेची जोड देत सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमातून प्रयत्न करण्यात आला.
सण-उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते. अशा वेळी परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे आणि सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारणे आवश्‍यक असते. याच जाणिवेतून रांगोळीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.


या उपक्रमावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, छबुराव काळे, सुनील काळे, मयूर काळे, सुरेश काळे, रामदास काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, मंदाताई डोंगरे, प्रतिक्षा म्हसे, अचल काळे, वर्षा काळे, प्रिय काळे, अक्षदा मुसळे, माया काळे, रेशमा काळे, दिलीप काळे आदी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्वच्छता ही केवळ सणापुरती नव्हे, तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. “नवरात्रोत्सव आणि विजयादशमी हे आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचे सण आहेत. या सणांच्या माध्यमातून आपण चांगल्या विचारांचा स्वीकार करतो आणि वाईट प्रवृत्तींचा त्याग करण्याचा संकल्प करतो. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील अस्वच्छता दूर करून स्वच्छ आणि सुंदर गाव निर्माण करण्याचाही संकल्प आपण करावा असे त्यांनी आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *