• Mon. Oct 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

सन फार्मा विद्यालयात अंधश्रद्धेविरोधात विज्ञानवादी विचारांचा जागर

ByMirror

Oct 19, 2026
विद्यार्थ्यांनी जाणून घेतली बुवाबाजीतील हातचलाखी

आरएसपीचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न


विद्यार्थ्यांनी जाणून घेतली बुवाबाजीतील हातचलाखी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बालवयात अंधश्रद्धा बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने ‘विज्ञान जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंनिसच्या वतीने विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा आणि त्यांच्या मनातील जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगरचे प्रधान सचिव टी. के. जगधने यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व आणि अंधश्रद्धेचे दुष्परिणाम यांवर प्रकाश टाकला. प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारणभाव शोधणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.


यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब सातपुते, विनायक सापा, टी. के. जगधने आणि आरएसपी अधिकारी राजेंद्र धस यांनी कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा यांनी अनेक चमत्कार वाटणाऱ्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करून त्यामागील वैज्ञानिक सत्य विद्यार्थ्यांसमोर उलगडले. तथाकथित चमत्कार किंवा बुवाबाजीमध्ये हातचलाखीने वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्या कशा प्रकारे विज्ञानाच्या आधारे सादर केल्या जातात, हे त्यांनी विविध प्रयोगांद्वारे दाखवून दिले. या सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब सातपुते, ससे, बारस्कर, श्रीमती महांडुळे, भोगे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष संपतराव बारस्कर यांनी अंनिसच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या आणि बुवाबाजी करणाऱ्या भोंदू व्यक्तींपासून समाजाचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः जागरूक होऊन पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडण्यास मदत होते, असे मत आरएसपी अधिकारी राजेंद्र धस यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी बारस्कर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *