जळगाव येथील वरिष्ठ महिला आंतरजिल्हा फुटबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत दमदार प्रदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जळगाव येथे पार पडलेल्या वरिष्ठ महिला आंतरजिल्हा फुटबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 मध्ये अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (ADFA) अहिल्यानगर जिल्हा वरिष्ठ महिला संघाने शानदार आणि संघर्षपूर्ण कामगिरी करत उपविजेतेपद (Second Runners-Up) पटकावले. मागील वर्षीही द्वितीय उपविजेतेपद मिळवलेल्या अहिल्यानगर संघाने यंदाही आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत जिल्ह्याच्या महिला फुटबॉलची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली.
नुकतेच झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात अहिल्यानगर जिल्हा संघाने वर्धा जिल्हा संघाचा 12-1 गोलफरकाने धुव्वा उडवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात सुमय्या शेखने तब्बल 7 गोल, तनिषा शिरसुळने 4 गोल, तर निकिता रामावतने 1 गोल करत संघाच्या मोठ्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सुमय्या शेखच्या शानदार सात गोलांच्या कामगिरीने सामन्यात विशेष लक्ष वेधून घेतले.
उपांत्य फेरीत अहिल्यानगरचा सामना बलाढ्य मुंबई जिल्हा संघाशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अहिल्यानगर संघाला 0-1 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. अहिल्यानगरच्या खेळाडूंनी संपूर्ण सामन्यात विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. संघाने शेवटपर्यंत झुंज देत सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला; मात्र एका गोलच्या फरकाने विजय हुकला. या पराभवानंतरही संघाची जिद्द आणि लढाऊ वृत्ती कायम राहिली.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात अहिल्यानगर जिल्हा संघासमोर ठाणे जिल्हा संघाचे आव्हान होते. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केल्याने सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. अहिल्यानगरकडून सुमय्या शेखने सुरुवातीलाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र ठाणे संघाने दमदार पुनरागमन करत बरोबरीचा गोल केला आणि सामना टाय-ब्रेकरमध्ये गेला. टाय-ब्रेकरमध्ये अहिल्यानगर संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले. संघाच्या गोलरक्षकाला दुखापत झाल्यामुळे सुमय्या शेखने गोलरक्षकाची जबाबदारी स्वीकारली. मैदानावरील आपल्या आक्रमक भूमिकेतून थेट गोलरक्षकाची भूमिका स्वीकारत तिने अप्रतिम कामगिरी केली आणि सलग तीन पेनल्टी वाचवत संघाला विजयाच्या दिशेने नेले.
अहिल्यानगरकडून तनिषा शिरसुळ, राणी कदम आणि सुमय्या शेख यांनी टाय-ब्रेकरमध्ये पेनल्टी गोल करत संघाला 3-1 असा विजय मिळवून दिला. या रोमांचक विजयासह अहिल्यानगर जिल्हा संघाने स्पर्धेतील द्वितीय उपविजेतेपद निश्चित केले.
अहिल्यानगर जिल्हा संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद व अमरजीत सिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव व व्हिक्टर जोसेफ, कोषाध्यक्ष रिशपाल सिंग परमार, सहायक कोषाध्यक्ष रणबीरसिंग परमार तसेच सर्व समिती सदस्य यांनी संघाचे अभिनंदन केले.
संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक प्रसाद पाटोळे आणि संघ व्यवस्थापक प्रियंका सूर्यवंशी आणि सपोर्ट स्टाफ यांनी दाखवलेली शिस्त, संघभावना, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानण्याची वृत्ती कौतुकास्पद असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. विशेषतः ठाणेविरुद्धच्या सामन्यात गोलरक्षकाला दुखापत झाल्यानंतर सुमय्या शेखने गोलरक्षकाची जबाबदारी स्वीकारून सलग तीन पेनल्टी वाचवणे, तसेच तनिषा शिरसुळ, राणी कदम आणि सुमय्या शेख यांनी पेनल्टीमध्ये गोल करत संघाला विजय मिळवून देणे, हा संघाच्या लढाऊ वृत्तीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
अहिल्यानगर जिल्हा वरिष्ठ महिला संघाच्या या सलग दुसऱ्या द्वितीय उपविजेतेपदाबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
–
उपविजयी संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे:
राणी कदम (कर्णधार), सुमैय्या शेख, तनिषा शिरसूळ, दुर्वा गडाख, सोनिया दोसाणी, सूर्य नयना, शोभा गंधेर, पूजा भिंगारदिवे, प्रियंका आवारे, साक्षी जाधव, वैष्णवी रोकडे, निकिता रामावत, अक्षरा गोंटला, अश्विनी पाटोळे, निकिता भिंगारदिवे, श्रेया कावरे.

