अहिल्यानगरमध्ये क्रीडा संस्कृतीचा जागर; विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले नागरिकांचे लक्ष
खेळातून शिस्त, आरोग्य अन् यशाची जिद्द निर्माण होते -आयुक्त यशवंत डांगे
हॉकीपासून मल्लखांब, तलवारबाजीपासून सायकलिंगपर्यंत… प्रोफेसर चौकात रंगला क्रीडोत्सव!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खेळांविषयी जनजागृती निर्माण होऊन क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, तसेच तरुण पिढीने मैदानी खेळांकडे वळावे, या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शनिवारी (दि. 29 ऑगस्ट) सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सकाळपासूनच संपूर्ण रस्ता खेळाडूंनी गजबजून गेला होता. विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा ऑलिंपिक संघटना, एकविध खेळ संघटना आणि विविध क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध खेळांचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच ऑलिंपिकवीर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, सतीश शिंदे, मनोज दुल्लम, तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, कोमल वाकळे, मनीषा पुंडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाची पार्श्वभूमी विशद केली. क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व खेळाडूंची असल्याचे त्यांनी सांगितले. आपला देश कॉमनवेल्थ आणि ऑलिंपिकमध्ये पदके मिळविण्यासाठी यशस्वी वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत काळोखे यांनी ऑलिंपिकवीर मेजर ध्यानचंद यांचा जीवनपरिचय करून दिला. हॉकी या खेळासाठी मेजर ध्यानचंद यांनी दिलेल्या योगदानाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
नगरसेवक करण कराळे म्हणाले की, आरोग्यासाठी मैदानी खेळ ही काळाची गरज बनली आहे. याबाबतची जनजागृती खेळाडूंच्या माध्यमातून होणार आहे. अहिल्यानगर शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत आणि त्यांनी देशासाठी पदके मिळवावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावे, असे आवाहनही कराळे यांनी केले. आपल्या आजोबांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, वयाच्या 78व्या वर्षीही ते निरोगी असून दररोज मैदानावर जाऊन व्यायाम करतात.
महापालिका आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, खेळामुळे जीवनात शिस्त निर्माण होते आणि उत्तम आरोग्य लाभते. मानवी जीवन संघर्षमय असून, खेळामुळे अपयश पचविण्याची आणि पुन्हा प्रयत्न करून यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची शिकवण मिळते. यशाची पायरी चढण्याची जिद्द खेळातून निर्माण होते. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मैदानी खेळांकडे वळवावे, असे आवाहन त्यांनी केले. खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता त्यातून करिअरही घडू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचा पाठ्यपुस्तकात धडा आहे, याचा उल्लेख करत आयुक्त डांगे म्हणाले की, माणूस जीवंत असतानाच त्याचा पाठ्यपुस्तकात धडा येणे हे खेळाच्या माध्यमातून शक्य आहे. शहरात खेळाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात झुंबा नृत्याने झाली. त्यानंतर हॉकीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पुरलेला मल्लखांब आणि रोप मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकविला. मल्लखांबपटूंनी सादर केलेल्या विविध कसरतींना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. यानंतर सायकलिंग, स्केटिंग, रायफल शूटिंग, तलवारबाजी, व्हॉलीबॉल, ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग आणि खो-खो या विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध खेळांतील खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केल्याने उपस्थित पालक आणि नागरिकांनी या उपक्रमाचा आनंद घेतला.
विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी पालकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळच्या वेळेत प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून आली. त्यामुळे संपूर्ण परिसराला क्रीडोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, इन्फिनिटी सायक्लोथॉन, अहिल्यानगर, बाईक टेक पॉइंट आणि सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना सायकल भेट देण्यात आली. क्रीडा दिनाच्या निमित्ताने सायकलिंगला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जलतरण संघटनेचे रावसाहेब बाबर, ऑलिंपिक संघटनेचे शैलेश गवळी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे, श्री समर्थ प्रशाळेच्या प्राचार्य वसुधा जोशी, क्रीडा शिक्षक लोंढे सर, आसिफ शेख, नंदेश शिंदे, कुलकर्णी सर, प्रा. संजय साठे, सुदर्शन कोतकर, भापकर, सुनील गोडळकर, आदित्य धोपावकर, निलेश मदने, गणेश वारुळे, रामेश्वर चेमटे, विकास परदेशी, शकील शेख, मोहनीराज लहाडे, अल्ताफ कडकाले,क्रीडा भारतीचे वेदपाल सर, सुधीर चपळगावकर, ऋषिकेश दरंदले, प्रसाद पाटोळे, श्रीरंग कुलकर्णी आणि संजय धोपावकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब बाबर यांनी केले.

