• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

संविधानाचा जागर करुन भिंगारच्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले युवक-युवती

ByMirror

Apr 14, 2026
संविधानाचा जागर करुन भिंगारच्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले युवक-युवती

जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले वातावरण; विविध स्पर्धेत युवक-युवतींचा जोशपूर्ण सहभाग


बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या जीवनात उतरले पाहिजेत -शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भिंगार येथे मंगळवारी (दि.14 एप्रिल) आयोजित करण्यात आलेली मिनी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. संविधान, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा जागर करत युवक-युवतींसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला.


भीम जयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, भिंगार यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून “जय भीम”च्या घोषणांनी झाली. संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांनी भूषविले. यावेळी उद्योजक लॉरेन्स स्वावी, कार्यक्रमाचे संयोजक मुख्याध्यापक सुहास धीवर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब बोडखे, बाळासाहेब पतके, कॅन्टोमेंट स्कूलचे मुख्याध्यापक संजय शिंदे, डॉ. लविना लॉरेन्स स्वामी, प्रदीप भिंगारदिवे, अध्यक्ष सिध्दांत भिंगारदिवे, प्रदीप भिंगारदिवे, धीरज भिंगारदिवे, सुमेध थोरात, आदित्य भिंगारदिवे, गौरव भिंगारदिवे, आतिश शिरोळे, सागर भिंगारदिवे, किसन शेकडे, आशाबाई धीवर, सिताबाई भिंगारदिवे, द्वारकाबाई थोरात, आशा साळवे, विमल तांबे, शशिकला भिंगारदिवे, सुनिता भिंगारदिवे आदींसह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या वेळी मिनी मॅरेथॉनसोबतच रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धाही घेण्यात आल्या. या स्पर्धांनाही शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी भिंगारमधील मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येने युवक-युवती आणि विद्यार्थी जमले होते. विविध सहा वयोगटांमध्ये स्पर्धा पार पडली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निळा झेंडा दाखवताच स्पर्धकांनी प्रचंड उत्साहाने धाव घेतली. उत्कृष्ट नियोजन, स्वयंसेवकांचे योगदान आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली. स्पर्धेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी चैतन्य साळवे यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल आणि एमपीएससी परीक्षेद्वारे धर्मदाय आयुक्त निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या ज्योती सकट यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


प्रास्ताविकात सुहास धीवर म्हणाले की, भारताचे महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समता आणि स्वाभिमानाचा जो दीप प्रज्वलित केला, तो अखंड तेवत ठेवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. भीम जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मागील 21 वर्षांपासून आम्ही मिनी मॅरेथॉन, मिरवणूक आणि विविध शैक्षणिक स्पर्धा आयोजित करत आहोत. या उपक्रमांचा उद्देश केवळ उत्सव साजरा करणे नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे हा आहे. आजच्या युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे. खेळ, शिक्षण आणि संस्कार यांच्या माध्यमातून सक्षम पिढी घडविणे हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले की, संविधान हा आपल्या देशाचा पाया आहे आणि त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाच्या जीवनात उतरले पाहिजेत. आज भिंगारमध्ये आयोजित करण्यात आलेली ही मिनी मॅरेथॉन केवळ क्रीडा स्पर्धा नसून सामाजिक संदेश देणारा उपक्रम आहे. युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहून भविष्यातील भारत अधिक सक्षम आणि जागरूक असेल, याची खात्री वाटते. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढते, तसेच त्यांना योग्य दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पर्धा यशस्वीतेसाठी भिंगार येथील दिग्विजय क्रीडा मंडळाचे भरत थोरात, भिंगार स्पोर्ट्‌स क्लबचे मेजर विठ्ठल काळे, शंकर औरंगे, रमेश वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य सेवेसाठी छावणी परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलचे डॉ. राहुल ढाकणे व रुग्णवाहिका चालक शरद धाडगे यांनी तत्पर सेवा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पसपूल यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप भिंगारदिवे यांनी केले.


मिनी मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल
खुला गट (मुले) प्रथम कृष्णा सखाहरी गायके, द्वितीय विक्रम बोरुडे, तृतीय प्रथमेश राठोड
खुला गट (मुली) प्रथम माही प्रितम परदेशी, द्वितीय वैभवी विजय खेडकर, तृतीय श्रावणी बेरड
17 वर्षे वयोगट (मुले) प्रथम नवनाथ संजय बेद्रे, द्वितीय सर्वेश दळवी, तृतीय पुलप भंडारी
17 वर्षे वयोगट (मुली) प्रथम प्रणिता हिकरे, द्वितीय निकिता परदेशी, तृतीय समीक्षा संतोष भालेराव
14 वर्षे वयोगट (मुले) प्रथम निरंजन श्‍याम काळे, द्वितीय अथर्व नितीन लिचारे, तृतीय उमेर इर्शाद शेख
14 वर्षे वयोगट (मुली) प्रथम ईश्‍वरी अमर गोसावी, द्वितीय प्रगती मुकुंद पांढरे, तृतीय सई किरण बरबडे

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *