• Sun. Nov 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

महात्मा फुलेंचे विचार समाजपरिवर्तनासाठी आजही प्रेरणाशक्ती! -विजय भालसिंग

ByMirror

Nov 29, 2026
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


शिक्षण, समता आणि माणुसकीचा विचार देणाऱ्या महात्म्याला सलाम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, विषमता आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक समता, शिक्षण आणि माणुसकीची मूल्ये जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर त्यांनी संपूर्ण समाजाला विचारांची नवी दिशा देणारे महान क्रांतिकारक होते. ज्या काळात समाजात जातिभेद, अस्पृश्‍यता, अंधश्रद्धा आणि स्त्री-पुरुष विषमता मोठ्या प्रमाणात होती, त्या काळात त्यांनी या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध धैर्याने आवाज उठविला. शिक्षण हेच माणसाच्या आणि समाजाच्या प्रगतीचे खरे साधन आहे, हा विचार त्यांनी कृतीतून सिद्ध केला.


महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगता यावे आणि प्रत्येकाला समान संधी मिळावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आज महिला विविध क्षेत्रांत यशाची शिखरे गाठत आहेत, त्यामागे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पेटविलेल्या शिक्षणाच्या क्रांतीची मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.


या अभिवादनप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे उत्कर्ष परदेशी, उद्योजक भीमाजीराव जाधव, महादेव भुतारे, संतोष मेहत्रे, शिवाजी जाधव, मच्छिंद्र पडोळे, संजय केदार, राजेंद्र सातपुते आदी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *