• Fri. Nov 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्या नगरच्या मुलींची राज्य संघाच्या दिशेने झेप!

ByMirror

Nov 27, 2026
अहिल्या नगरच्या मुलींची राज्य संघाच्या दिशेने झेप!

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलींच्या फुटबॉल संघाच्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरासाठी प्रांजल काकडे व सिद्धी पोटे यांची निवड


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (ADFA), अहिल्यानगरच्या कनिष्ठ मुलींच्या फुटबॉल संघातील प्रांजल अर्जुन काकडे आणि सिद्धी शिवाजी पोटे या दोन खेळाडूंची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलींच्या फुटबॉल संघाच्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. हे निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर बुधवार २५ नोव्हेंबर पासून मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.


या शिबिरातून निवडण्यात येणारा महाराष्ट्राचा संघ आगामी राष्ट्रीय कनिष्ठ मुलींच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार असून ही राष्ट्रीय स्पर्धा १२ ते १७ डिसेंबर २०२६ दरम्यान गुवाहाटी, आसाम येथे पार पडणार आहे.
प्रांजल काकडे आणि सिद्धी पोटे यांनी नुकत्याच जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलींच्या आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हा संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. उपांत्यपूर्व फेरीत अहिल्यानगर संघाला अत्यंत अटीतटीच्या सामन्यात निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, कौशल्य आणि सांघिक भावना निश्चितच कौतुकास्पद ठरली.


ADFA अहिल्यानगरसाठी ही निवड विशेष अभिमानाची बाब आहे. यापूर्वी ADFA वरिष्ठ महिला संघातील सुमय्या शेख आणि राणी कदम यांनी सलग दोन हंगाम महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आता कनिष्ठ मुलींच्या गटातील दोन खेळाडूंची राज्य संघाच्या निवड प्रक्रियेसाठी झालेली निवड ही अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला फुटबॉलच्या प्रगतीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.


जिल्ह्यातील मुलींच्या फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी ADFA सातत्याने प्रयत्नशील असून, या यशामुळे भविष्यात अधिकाधिक मुलींना फुटबॉलकडे वळण्यासाठी आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, अमरजीतसिंह शाही, मानद सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव व व्हिक्टर जोसेफ, राजू पाटोळे, खजिनदार रिशपाल सिंह परमार, सहखजिनदार रणबीर सिंह परमार, तसेच कार्यकारिणी , जिल्हा संघ प्रशिक्षक प्रसाद पाटोळे, संघ व्यवस्थापक आश्विनी पाटोळे आणि असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.


या यशामध्ये जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेपूर्वी गुलमोहर फुटबॉल क्लबने अहिल्यानगर जिल्हा कनिष्ठ मुलींच्या संघाला सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासह प्रशिक्षण व तयारीसाठी सहकार्य केल्याबद्दल गुलमोहर फुटबॉल क्लबचे विशेष आभार मानले. तसेच ADFA कार्यकारिणी सदस्य पल्लवी सैंदाणे आणि ADFA कार्यकारिणी सदस्य तसेच गुलमोहर फुटबॉल क्लबचे मालक जोहेब खान यांच्या सहकार्याचे व योगदानाचे असोसिएशनतर्फे विशेष कौतुक करण्यात आले.
मुंबई येथे होणाऱ्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरासाठी प्रांजल आणि सिद्धी यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या असून, महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना उज्ज्वल यश लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *