राष्ट्रीय झोनल स्पर्धेत प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य; संघ शिरपूरला रवाना
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीचा 13 वर्षांखालील मुलांचा संघ सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र राज्य युवा फुटबॉल लीगमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवत फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी अहिल्यानगरच्या युवा फुटबॉलला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब ठरली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) आयोजित महाराष्ट्र राज्य युवा क्लब फुटबॉल लीग 2026-27 स्पर्धेचा पहिला टप्पा 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान शिरपूर (जि. धुळे) येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी संघ नुकताच रवाना झाला आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी राईस सिटी फुटबॉल क्लब, भंडारा विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्याचा पहिला सामना राहणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील दहा संघ सहभागी होत आहेत. त्यामध्ये ॲड्रेनालिन स्पोर्ट्स पुणे, सीएफसी रायगड रायगड, डेरवण एफसी रत्नागिरी, रायझिंग फुटबॉल अकॅडमी मुंबई, नेव्हर बॅक डाउन एफसी पालघर, राईस सिटी फुटबॉल क्लब भंडारा, नाशिक ज्युनियर्स एफसी नाशिक, नोबेल स्पोर्ट्स अकॅडमी नागपूर, ठाणे सिटी एफसी ठाणे आणि फिरोदिया शिवाजियन्स अहिल्यानगर यांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) आयोजित राष्ट्रीय झोनल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय या स्पर्धेला विशेष महत्त्व असून राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याच्या दृष्टीने ही खेळाडूंसाठी मोठी संधी ठरणार आहे.
फिरोदिया शिवाजियन्सच्या 15 खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व वेदांत सुभाष बांगर करणार असून वरद पंकज वाघ उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. संघात साईश धर्मेंद्र जाधव, क्रिस्टन डेव्हिड नीरो, लोकेश अक्षय मुनोत, समीर रहीम खान, युवराज योगेश आहेर, विहान निलेश बोथरा, प्रिन्स कुंदन पडाळे, सनव रोहित बोरा, निशात सुहास कांबळे, रोनव हर्षल गुंदेचा, साई सतीश कुरळे, रणविजय दत्ता जामकर, कार्तिक सुरेश चव्हाण यांचा समावेश आहे.
संघासोबत प्रशिक्षक जॉर्डन फर्नांडिस आणि अभिषेक सोनवणे असणार आहेत. तर डॉ. प्रियंका सूर्यवंशी या व्यवस्थापक व फिजिओथेरपिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीसाठी क्लबच्या कोअर कमिटीचे सदस्य पल्लवी सैदाणे, जेव्हिअर स्वामी, राजेश अँथनी आणि सचिन पात्रे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
क्लबचे सहमालक नरेंद्र फिरोदिया आणि मनोज वाळवेकर यांनी “अहिल्यानगरमधील युवा फुटबॉलपटूंमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आमचा प्रयत्न आहे. आमच्या खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याची भावना व्यक्त करुन सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सदस्यांनीही संघातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

