• Mon. Nov 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगचे प्रारंभ

ByMirror

Nov 23, 2026
अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगचे प्रारंभ

कडाक्याच्या थंडीतही मैदानावर खेळाडूंचा थरार रंगला; आठ संघांचे विजेतेपदासाठी संघर्ष;


पुण्यातील नामांकित फुटबॉल क्लबचे निवड समिती सदस्य गुणवंत खेळाडूंची करणार निवड


खेळातून शिस्त, बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमता विकसित होते -सुदर्शन मुम्मका (जिल्हा पोलीस अधीक्षक)
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील फुटबॉल खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग (ए.एफ.एस.एल.) 2026 च्या पाचव्या पर्वाचा प्रारंभ नगर क्लबच्या मैदानावर मोठ्या उत्साहात झाला. शहरात कडाक्याची थंडी असतानाही मैदानावर उतरलेल्या आठही संघांतील खेळाडूंच्या दमदार खेळाने आणि चुरशीच्या सामन्यांनी वातावरण चांगलेच तापले आहे. सकाळपासून सुरू झालेले सामने रात्री उशिरापर्यंत रंगत असून, फुटबॉलप्रेमींना दिवस-रात्र सामन्यांचा थरार अनुभवायला मिळत आहे. नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी क्रीडा पत्रकार जोसेफ विल्यम्स, नमोह फुटबॉल क्लबच्या ओनर नमिता फिरोदिया, महावीर ग्रुपचे राजेश भंडारी, डॉ. अमोल जाधव यांच्यासह विविध संघांचे मालक व त्यांचे प्रतिनिधी, खेळाडू, प्रशिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात खेळाडूंनी आपापल्या संघांचे ध्वज घेऊन संचलन केले. यावेळी खेळाडूंनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार सोहळ्यात पाचव्या पर्वाचा शुभारंभ झाला.


प्रास्ताविकात नमिता फिरोदिया म्हणाल्या की, ग्रास रूटवर जाऊन फुटबॉलचे खेळाडू घडविण्याचे कार्य नमोह फुटबॉल क्लब करत आहे. 800 मुलांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे. क्लबच्या माध्यमातून विविध 75 टूर्नामेंट घेण्यात आले आहे. शहरात फुटबॉलचे टॅलेंट वाढवण्याचे व खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या स्पर्धेतून केले जात आहे. सर्वांना सोबत घेऊन शहरात फुटबॉलचा इतिहास घडविण्यासाठी योगदान दिले जात असल्याचे त्या म्हणाल्या.


जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका म्हणाले की, मैदानी स्पर्धेतून खेळाडूंमध्ये शिस्त निर्माण होते. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे, मात्र त्याला प्रोत्साहन व व्यासपीठ देण्याची गरज आहे. अशा स्पर्धेतून खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. खेळातून शिस्त, बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमता विकसित होते. युवकांमध्ये आत्मविश्वास वाढतो. खेळावर प्रेम करा, खेळातून भरपूर तुम्हाला मिळेल. सध्या शहरी भागात मोबाईलमुळे मैदानावर खेळणे कमी झाले असले तरी अहिल्यानगरमध्ये मैदानावर खेळाडू दिसतात. येथे रुजलेल्या क्रीडा संस्कृतीचे हे प्रतीक आहे. अभ्यासाबरोबर खेळायलादेखील महत्त्व द्या, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू घडावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच आठवीमध्ये जिल्हास्तरावर खेळताना जिल्ह्याबाहेर तिरुपतीमध्ये फुटबॉल खेळल्याच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.


क्रीडा पत्रकार जोसेफ विल्यम्स यांनी ही स्पर्धा शहरात फुटबॉल खेळायला ऊर्जा देणारी आहे. अशा स्पर्धेतूनच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू घडत असतात. खेळातून शिस्त असलेला खेळाडू घडतो. खेळाडूंना खेळाचा व प्रशिक्षकांचा आदर, सन्मान करण्याचे व खेळाडूवृत्तीने पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.
यंदाच्या स्पर्धेत आठ संघांमधील खेळाडूंचे सामने दिवस-रात्र साखळी पद्धतीने सुरू आहेत. संघांमध्ये होणारी चुरस, खेळाडूंचे तंत्रकौशल्य, वेगवान खेळ आणि गोल करण्यासाठीची धडपड मैदानावर अनुभवायला मिळत आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक फुटबॉलपटूंना व्यावसायिक पद्धतीने खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.


विशेष म्हणजे पुण्यातील नामांकित सिटी पुणे फुटबॉल क्लब आणि पुणे पायोनिअर्स फुटबॉल क्लबचे निवड समिती सदस्य या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. दोन दिवस खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण करून उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या गुणवंत खेळाडूंना संबंधित क्लबच्या संघात स्थान मिळविण्याची तसेच व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील खेळाडूंना शहराबाहेरील मोठ्या फुटबॉल व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळणार आहे.


यंदाच्या स्पर्धेत एमडी अँड आरडीएक्स इन्फ्रा, गुलमोहर चॅलेंजर्स, गांधी वॉरियर्स, डायनामिक स्ट्रायकर, एक्सलन्स अचिव्हर्स, विद्यादान अल्फा एक्स, डॉक्टर बायो आणि नवा मराठा योद्धा हे आठ संघ विजेतेपदासाठी मैदानावर उतरले आहेत. या सर्व संघांमध्ये मिळून शहरातील 105 खेळाडूंचा समावेश आहे. संघमालक म्हणून ऋत्विक वाबळे, जोएब खान, चेतन गांधी, सिद्धार्थ मुनोत, आशिष टट्टू, रोहित रामदिन, सचिन सोलाट, ॲड. ललित गुंदेचा, अभिनंदन आणि रुही भन्साळी हे जबाबदारी सांभाळत आहेत.


स्पर्धेच्या आयोजनासाठी अभिनंदन आणि रुही भन्साळी (अवित्री मोशन) हे को-पॉवर, राजेश भंडारी (महावीर ग्रुप) किट स्पॉन्सर, तर प्रणिल मुनोत (कॉनप्लेक्स) को-स्पॉन्सर आहेत. याशिवाय राम एजन्सी, शिवम सायकल, फन्की लॅण्ड, अमित ट्रेडर्स, जलाराम फुड्स आणि खेलोफाय यांचेही सहकार्य लाभले आहे. अहिल्यानगरमधील फुटबॉल खेळाडूंना स्थानिक स्तरावरून व्यावसायिक फुटबॉलपर्यंत पोहोचण्याची संधी देणारी ही स्पर्धा शहरातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा देणारी ठरत असल्याची भावना उपस्थित संघ मालकांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *