• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा

ByMirror

Apr 14, 2026
मल्लांनी पटकाविले रोख बक्षिसे; मानाच्या कुस्त्या बरोबरीत

मल्लांनी पटकाविले रोख बक्षिसे; मानाच्या कुस्त्या बरोबरीत


कावड मिरवणूक व संदल-उरुसमधून धार्मिक एकतेचे दर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 13 एप्रिल) आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती आखाड्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. लाल मातीच्या आखाड्यात रंगलेल्या थरारक कुस्त्यांनी उपस्थित ग्रामस्थांचे अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडले. हलगी-डफाच्या गजरात आणि ‘बजरंग बली’च्या जयघोषात पार पडलेल्या या कुस्त्यांमध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.


आखाड्यातील मल्लांच्या डाव-प्रतिडावांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. चितपट झालेल्या कुस्त्यांवर ग्रामस्थांनी रोख बक्षिसांचा वर्षाव केला. यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विजयी व उपविजयी मल्लांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. मानाची कुस्ती पै. संदीप डोंगरे विरुद्ध पै. ऋषीकेश चत्तर यांच्यात रंगली. अत्यंत चुरशीच्या या लढतीचा शेवट बरोबरीत झाला. तसेच पै. सुरज चत्तर विरुद्ध मयुर डोंगरे यांच्यातील कुस्तीही रंगतदार झाली आणि ती देखील बरोबरीत सुटली. याशिवाय पै. महेश शेळके, गोवर्धन शिंदे, साहिल म्हसे, संदेश जाधव, विराज डोंगरे, अमित धोत्रे, स्वराज कापसे आणि रुद्र पवार या मल्लांच्या कुस्त्यांनीही आखाडा गाजवला. विशेष म्हणजे महिला कुस्तीपटू अलफिया शेख हिनेही आपल्या उपस्थितीने स्पर्धेची शोभा वाढवली. तिच्यासह जिल्ह्यातील अनेक महिला व दिग्गज मल्लांनीही सहभाग घेतला. कुस्ती क्षेत्रातील वस्ताद मंडळींचा ग्रामस्थांच्या वतीने रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, उपसरपंच किरण जाधव, नगर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भानुदास ठोकळ, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, उद्योजक अरुण फलके, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, रविंद्र डावखर, अनिल डोंगरे, मधू पवार, बाबा केदार, अरुण कापसे, अजय ठाणगे, ज्ञानदेव कापसे, मच्छिंद्र काळे, बबन शेळके, वैभव फलके, नामदेव भुसारे, मच्छिंद्र कापसे, सुखदेव जाधव, विकास निकम, पिंटू जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरम्यान, यात्रेनिमित्त रविवारी (दि. 12 एप्रिल) युवकांनी कावडीने आणलेल्या गंगाजलाची पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री बिरोबा महाराजांच्या मूर्तीवर गंगाजलाने अभिषेक करून विधीवत पूजा करण्यात आली. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री छबीना मिरवणूक उत्साहात पार पडली.


यात्रेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करिमशहा वली बाबांचा संदल-उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मिरवणुकीत गावातील सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले होते, ज्यातून धार्मिक एकतेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. करिमशहा वली बाबांच्या दर्ग्यातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. संदल-उरुस यशस्वी करण्यासाठी राजू शेख आणि गुलाब शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *