• Sun. Nov 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

गंजबाजार येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ByMirror

Nov 29, 2026
महात्मा फुलेंना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या!

महात्मा फुलेंना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या!


महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय समाजव्यवस्थेत समता, बंधुता आणि शिक्षणाची क्रांती घडविणारे समाजसुधारक -डॉ. सुनील सकट


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यानगर येथील गंजबाजारमधील भाजीपाला, फळे व फुले मंडई परिसरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी केलेले अतुलनीय कार्य आणि सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.


गंजबाजार येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास राजेंद्र आगरकर, मच्छिंद्र आगरकर आणि महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील सकट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा दिला. या अभिवादन कार्यक्रमास राजेंद्र आगरकर, मच्छिंद्र आगरकर, अनिकेत आगरकर, श्रीरंग शिर्के, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त डॉ. सुनील सकट, राजेंद्र कलमदाने, संतोष सुकटकर, दिगंबर होडशिळ, रवींद्र चिपाडे, संदीप बेल्हेकर आदी उपस्थित होते.


अनिकेत आगरकर यांनी महात्मा फुले यांच्या अद्वितीय कार्याचे स्मरण केले. ते म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि विषमतेविरुद्ध संघर्ष केला. शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजघटकांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली. स्त्री शिक्षणाचा पाया रचून महिलांच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील सकट म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय समाजव्यवस्थेत समता, बंधुता आणि शिक्षणाची क्रांती घडविणारे महान समाजसुधारक होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवून वंचित, शोषित आणि महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान आणि अन्याय दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे विचार आजही सामाजिक परिवर्तनासाठी मार्गदर्शक आहेत. महात्मा फुले यांनी केलेले कार्य हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील सुवर्णअध्याय आहे. देशातील सामाजिक समतेचा पाया मजबूत करणाऱ्या या महामानवाला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. भारतरत्न हा सन्मान त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा राष्ट्रीय गौरव ठणार असल्याचे ते म्हणाले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *