• Sun. Jul 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ByMirror

Jun 7, 2026
नवनाथ विद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड

नवनाथ विद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड


‘वृक्षारोपण आणि संवर्धन हाच पर्यावरण संकटावर प्रभावी उपाय’ -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


नवनाथ विद्यालयाच्या परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर आणि डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


यावेळी उपशिक्षक शरद भोस, मंदा साळवे, स्वाती इथापे, तृप्ती वाघमारे, प्रमोद थिटे, निकिता रासकर-शिंदे, तसेच श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, प्रशांत जाधव, बाळासाहेब डोंगरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना पै. नाना डोंगरे यांनी पर्यावरणाच्या वाढत्या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मानवाने स्वतःच्या विकासासाठी निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. जंगलतोड, प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर यामुळे पर्यावरणीय समतोल ढासळला असून संपूर्ण सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भविष्यातील संकटे टाळण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्‍यक आहे. निसर्गाशी सुसंवाद साधूनच मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनीही पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. शाळेच्या आवारात दरवर्षी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. अशाच प्रकारे गावभर वृक्षलागवड झाली तर निमगाव वाघा हे हरित आणि सुंदर गाव म्हणून ओळखले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


या उपक्रमादरम्यान फळझाडे, औषधी वनस्पती आणि सावली देणाऱ्या विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि जलसंवर्धन याबाबत जनजागृतीपर संदेशही दिले. कार्यक्रमातून वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *