जालिंदर बोरुडे यांच्या अथक प्रयत्नांतून 1160 अंधांना मिळाली नवदृष्टी; आता गरजूंकरिता ‘फिनिक्स नेत्रालय’ उभारण्याचे स्वप्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एका छोट्याशा गावातून सुरू झालेली चळवळ आज हजारो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश पेरत आहे. नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील जालिंदर बोरुडे यांनी सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेली नेत्रदान चळवळ आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदानाच्या माध्यमातून तब्बल 1160 दृष्टीहीन व्यक्तींना नवदृष्टी मिळवून दिली आहे.
‘नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन गेली तीन दशके सुरू असलेले हे कार्य आज राज्यभरात आदराने पाहिले जाते. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून केवळ नेत्रदान जागृतीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे मोठे जाळे उभे करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत असताना जालिंदर बोरुडे यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत त्यांनी 1991 मध्ये फिनिक्स फाऊंडेशनची स्थापना केली. सुरुवातीला नेत्रदान क्षेत्रात काम करण्याचा कोणताही ठराविक विचार नव्हता. मात्र विडी कामगार, हमाल, बांधकाम मजूर, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि गरीब घटकांमधील दृष्टीदोषाच्या समस्या पाहून त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचा निर्धार केला. त्यानंतर सुरू झालेला प्रवास आज हजारो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश आणणारा ठरला आहे.
फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दरमहा जिल्ह्यातील विविध भागांत मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जातात. नागरदेवळे, पारनेर, शेवगाव, नेवासा, पाथर्डी तसेच नगर शहरात नियमितपणे ही शिबिरे भरविली जातात. विशेष म्हणजे, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला नागरदेवळे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिराचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातून येणारे अनेक गरजू रुग्ण घेत आहेत. आतापर्यंत सुमारे 3 लाख 97 हजार 447 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली असून हजारो नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.
समाजकार्यात अनेकदा अडथळे येतात. “घरचं खाऊन कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजता?” अशा स्वरूपाचे टोमणेही जालिंदर बोरुडे यांना अनेकदा ऐकावे लागले. मात्र त्यांचे उत्तर कायम एकच असते “समाधान मिळतं ना, मग बस!” हेच समाधान त्यांना गेली 35 वर्षे या चळवळीत कार्यरत ठेवत आहे. आज त्यांच्या कार्यामुळे हजारो रुग्ण त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानतात.
नेत्रदान चळवळीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी जालिंदर बोरुडे यांनी ‘दृष्टीमित्र’ आणि ‘नेत्रज्योत’ ही दोन प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत. आजही फिनिक्स फाऊंडेशनच्या शिबिरांमध्ये राज्यभरातून नागरिक सहभागी होत असून नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
–
फिनिक्स नेत्रालयाचे स्वप्न लवकरच साकार
गरजू, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अत्याधुनिक व मोफत नेत्रोपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘फिनिक्स नेत्रालय’ उभारण्याची तयारी सुरू आहे. तपोवन रोड परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचे आराखडे आणि डिझाइन तयार झाले असून आवश्यक मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. लोकवर्गणी, समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य आणि सामाजिक सहभागाच्या बळावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे. फिनिक्स नेत्रालयाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दर्जेदार आणि मोफत नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा प्रकल्प निश्चितच पूर्णत्वास जाईल.-जालिंदर बोरुडे (संस्थापक अध्यक्ष, फिनिक्स सोशल फाऊंडेशन)
