डोंगरे संस्थेसह नवनाथ युवा मंडळ व ग्रामीण वाचनालयाचा उपक्रम; साथीच्या आजारांपासून बचावाचा दिला संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी आणि साथीच्या आजारांना प्रतिबंध करता यावा, या उद्देशाने स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी तसेच पारनेर तालुक्यातील चिंचोली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची जोड मिळावी, या हेतूने संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. गावातील मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच भाविकांची वर्दळ असलेल्या परिसरातील कचरा साफ करण्यात आला. नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखावी, कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये आणि उत्सव काळात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, गोरख चौरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवा पाटील होळकर, साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, कोंडीभाऊ फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
यानंतर पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील मळगंगा देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मंदिर परिसरातील कचरा व अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात काशिनाथ पळसकर, विनायक मगर, भाऊसाहेब कदम यांच्यासह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, गणेशोत्सव हा आनंद आणि भक्तीचा उत्सव आहे. मात्र, उत्सव साजरा करताना आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. स्वच्छ परिसर हा केवळ सुंदर दिसण्यासाठी आवश्यक नसून नागरिकांच्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता राहिल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढतो. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन, प्लास्टिकचा कमीत कमी वापर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे याबाबत नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. स्वच्छतेचा संदेश केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता तो वर्षभर प्रत्येकाच्या आचरणात उतरला पाहिजे. गाव, मंदिर आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता अभियानातून धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाणी साचणार नाही याची काळजी घेणे तसेच नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे, याबाबत जनजागृती करण्यात आली.

