• Thu. Sep 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

भटके-विमुक्त बांधवांसाठी हक्काच्या दाखल्यांची शहरात ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’

ByMirror

Sep 24, 2026
27 ते 29 सप्टेंबरदरम्यान विशेष अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन

27 ते 29 सप्टेंबरदरम्यान विशेष अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय दाखले मिळवून देण्यासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी श्री बालाजी श्रमजीवी संस्था (ट्रस्ट) आणि भटके व विमुक्त विकास परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27, 28 आणि 29 सप्टेंबर या कालावधीत राज्यभर विशेष अभियान राबविण्यात येत असून, या पार्श्‍वभूमीवर या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानाचा भटके-विमुक्त समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भटके विमुक्त विकास परिषदेचे राजाभाऊ वाडेकर तसेच श्री बालाजी श्रमजीवी संस्थेचे मुकेश हिरामण चखाले यांनी केले आहे. भटक्या जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबांकडे आवश्‍यक शासकीय कागदपत्रे व दाखले उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना शासकीय योजना, शैक्षणिक सवलती, आरक्षण तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन शासनाच्या माध्यमातून वस्तीनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.


या विशेष अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्‍यक दाखले व कागदपत्रे मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या भटके-विमुक्त समाजातील नागरिकांसाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. या विशेष शिबिरामध्ये आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका (रेशन कार्ड), नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आयुष्मान भारत कार्ड, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आदी आवश्‍यक कागदपत्रे व सुविधांसाठी मार्गदर्शन आणि प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबे आजही विविध शासकीय योजनांपासून केवळ आवश्‍यक कागदपत्रांच्या अभावामुळे वंचित राहतात. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या कुटुंबातील पात्र सदस्यांचे आवश्‍यक दाखले व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘हक्काचे दाखले मिळवा आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्या’ या उद्देशाने काशीकापडी समाज मंदिर, जे. जे. गल्ली, मंगलगेट येथे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजता या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय अभियानात भटके-विमुक्त समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजाभाऊ वाडेकर यांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *