चाँदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान; लावलेल्या प्रत्येक वृक्षाच्या संवर्धनाची घेतली जबाबदारी
वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षक नसून भावी पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा -प्रा. माणिक विधाते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक चाँदबीबी महाल परिसरात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि प्लास्टिकमुक्ती जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर डोफ्लगर परिसर व चाँदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक व इतर कचरा संकलित करण्यात आला. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या वापराविरोधात जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाच्या संगोपन व संवर्धनाची जबाबदारी ग्रुपच्या सदस्यांनी स्वीकारली.
यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, राजू कांबळे, पवन वाघमारे, रमेश वराडे, जहीर सय्यद, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, अशोक पराते, ताराचंद ठोकळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अविनाश पोतदार, अभिजीत सपकाळ, यशराज माने, मनोज मेहेर, सायकलपटू त्रिंबकराव नेटके, सचिन पेंढूरकर, दिलीप गुगळे, नवनाथ वेताळ, जालिंदर अळकुटे, रामनाथ गर्जे, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, मुन्ना वाघस्कर, किरण फुलारी, प्रकाश देवळालीकर, दीपक घोडके, ॲड. उद्धव चिमटे, आराध्या परदेशी, सोहम चेमटे, सूर्यकांत कटोरे, यश भिंगारदिवे, रतनशेठ मेहेत्रे, सुधीर कपाळे, सखाराम अळकुटे, अविनाश जाधव, उत्तम वाघस्कर, दशरथराव मुंडे, प्रशांत भिंगारदिवे, राजू शेख, भारत कनोजिया, अजय झिंजे, आनंद दळवी, राकेश वाडेकर, सतीश काळे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, “पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वाढता वापर यामुळे पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षक नसून भावी पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संजय सपकाळ म्हणाले की, “पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी, पावसाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आणि ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाची भूमिका बजावते. एकीकडे औद्योगिकीकरणामुळे विकास होत असला तरी दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास वाढत आहे. प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण आणि पशुपक्ष्यांसाठी धोकादायक ठरत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने त्याचा गंभीर परिणाम संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे प्लास्टिकमुक्त समाज उभारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सजीव सृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वृक्षारोपण आणि प्लास्टिक मुक्ती हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचे ते म्हणाले.
सचिन चोपडा यांनी सांगितले की, “पर्यावरण दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षभर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. घर, कार्यालय, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांनी सांगितले की, “निसर्गाचे जतन करणे ही केवळ सामाजिक नव्हे तर आध्यात्मिक जबाबदारीदेखील आहे. वृक्ष, जलस्रोत आणि जैवविविधता यांचे संरक्षण करणे म्हणजे सृष्टीची सेवा करणे होय. मानवाने निसर्गाशी सुसंवाद साधून जीवन जगले तरच भविष्यातील संकटे टाळता येतील. पर्यावरण संवर्धनाचा संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्त समाज निर्माण करण्याची शपथ घेतली.
