स्वातंत्र्यदिनी तिरंगा हाती घेत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी फिनिक्सच्या उपक्रमाचा आनंदोत्सव
अवयवदानाची जनजागृती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोषामुळे अंधुक झालेल्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याच्या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून 87 ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाली. पुणे येथील हॉस्पिटलमध्ये या ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. स्वातंत्र्य दिनी हे ज्येष्ठ नागरिक अहिल्यानगरमध्ये परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तिरंगा हाती घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम ’च्या घोषणा देत स्वातंत्र्याचा उत्साह साजरा केला. शासनाच्या अवयवदान सप्ताहानिमित्त अवयवदानाची देखील जनजागृती करण्यात आली.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान यावेळी स्पष्टपणे दिसून येत होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गरजू ज्येष्ठ नागरिकांना दृष्टीचा अनमोल प्रकाश मिळाल्याने हा दिवस त्यांच्यासाठी विशेष ठरला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दृष्टीहीन व मोतीबिंदूग्रस्त रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळावी, या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनने जिल्ह्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियांची चळवळ उभी केली आहे. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी तसेच राष्ट्रीय सण आणि विविध उत्सवांचे औचित्य साधून फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जातात.
या शिबिरांमध्ये तपासणीनंतर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविले जाते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे शक्य नसलेल्या अनेक रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. मोतीबिंदूमुळे दृष्टी कमी झाल्याने दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणाऱ्या ज्येष्ठांना शस्त्रक्रियेनंतर पुन्हा स्पष्ट दिसू लागल्याने त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण होत आहे. यामुळे केवळ उपचारच नव्हे, तर त्यांच्या स्वावलंबनालाही बळ मिळत असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने फिनिक्स सोशल फाऊंडेशन सातत्याने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे. दर महिन्याला गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून मोतीबिंदूग्रस्त रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. फिनिक्सच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक नागरिकांना महागड्या उपचारांचा आर्थिक भार न घेता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घेता येत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी ही आरोग्यसेवा आधारवड ठरत आहे.
फिनिक्स फाऊंडेशनच्या नेत्रविषयक उपक्रमातून केवळ मोतीबिंदू उपचारच केले जात नसून नेत्रदान व अवयवदानाबाबतही जनजागृती केली जात आहे. समाजातील नागरिकांनी मृत्यूनंतरही आपले डोळे व अवयव दान करून इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करावा, यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.
गरजू नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या सामाजिक बांधिलकीतून फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे कार्य सुरू असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.

