प्रगतिशील लेखक संघाच्या सहाव्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रगतिशील लेखक संघाने आजच्या नव्या पिढीतील लेखकांना अधिक संधी दिली पाहिजे. नवी पिढी संवेदनशील आहे हे त्यांनी दिल्ली येथील आपल्या आंदोलनातून सिद्ध केले आहे. त्यामुळे जे काही प्रगतिशील आंदोलने आहेत त्यांना टाळून चालणार नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्य कलावंत संजीव जीवने यांनी केले.
अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित प्रगतिशील लेखक संघाच्या सहाव्या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि.1 ऑगस्ट) संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन झाले. यावेळी ते बोलत होते. प्रगतिशील लेखक संघाचे राज्याध्यक्ष जी. के. ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाप्रसंगी स्वागताध्यक्ष कॉ. सुभाष लांडे, डॉ. स्मिता पानसरे, झारखंडचे हिंदी कादंबरीकार रणेंद्र, प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय सचिव विनीत तिवारी, राज्य कार्याध्यक्ष येशू पाटील, शंकर ब्रह्मे विज्ञान ग्रंथालयाचे नितीन ब्रह्मे, कॉ. राजू देसले, राज्य महासचिव कॉ. राकेश वानखेडे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे हिंदी कादंबरीकार रणेंद्र,म्हणाले, की मराठी साहित्य विश्वामध्ये दया पवारांचे बलुत, लक्ष्मण गायकवाड यांचे उचल्या, शरणकुमार लिंबाळे यांचे अक्करमाशी असे दलित आत्मकथनानी त्यांनी सर्व भारतीय भाषांना प्रभावित केले. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या शाहिरी परंपरेतून देखील प्रागतिक विचार पेरण्याचे काम केले. महाराष्ट्रात साहित्य शाहिरीच्या माध्यमातून कला संस्कृती चे परंपरा जपण्याचे काम केले विनीत तिवारी म्हणाले. अण्णा भाऊ साठे, मुंशी प्रेमचंद, यासारखे साहित्यिक हे केवळ मराठी भाषेपुरते मर्यादित राहिले नाही तर त्यांचे साहित्य सर्व भाषेत पोहोचले. आपल्याला मिळालेल्या क्रांतिकारी विचारांचा दायित्व आणि त्याची ताकद याचा स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे लेखकांनी आपल्या साहित्याला आंदोलनाचे हत्यार बनवले पाहिजे.
कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या की, साहित्यिकांचे मौन म्हणजे अन्यायाला दिलेली मूक संमती आहे. साहित्य हे परिवर्तनाचे साधन आहे. साहित्यामधून आपले आरोग्य, शिक्षण, रोजगार, अन्याय अत्याचार, शोषण हे विषय देखील साहित्यातून हाताळले पाहिजेत आणि दलित वंचित शोषित घटकांना आपल्या साहित्यातील नायक केले पाहिजे त्यासाठी नवी सांस्कृतिक चळवळ उभी करणे गरजेचे आहे समाज बदलण्यासाठी काय लिहिले पाहिजे त्याचा विचार करण्याबरोबरच कृती देखील करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी नव तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत अध्यक्ष सुभाष लांडे यांनी आपल्या स्वागत पर भाषणातून अहिल्यानगर जिल्ह्यातील परिवर्तनवादी चळवळीचा इतिहास सांगितला. यावेळी नितीन ब्रह्मे, येशू पाटील, राजू देसले, जी.के. ऐनापुरे यांची ही भाषणे झाली. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन झाले. शाहीर प्रा. डॉ. समाधान इंगळे अमरजीत बाहेती, कैवल्य चंद्रात्रे आणि सहकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे वामनदादा कर्डक यांच्यासह चळवळीची गाणी सादर केली.
प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉक्टर बापू चंदनशिवे यांनी प्रास्ताविक केले. तर तल्हा शेख यांनी सूत्रसंचालन केले. तर भगवान राऊत यांनी आभार मानले. प्रारंभी स्वागताध्यक्ष ॲड. कॉ सुभाष लांडे, ॲड. कॉ. बन्सी सातपुते, कॉ. स्मिता पानसरे, कवयित्री सरोज आल्हाट, राकेश वानखेडे, अजित अमर भगवान राऊत, डॉ. बापू चंदनशिवे यांनी लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे, हिराबाई भापकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

