• Thu. Sep 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेने अहिल्यानगरात रंगणार विद्यार्थ्यांचा बौद्धिक कौशल्याचा महासंग्राम

ByMirror

Sep 17, 2026

रविवारी स्नेहालयात स्पर्धेचे आयोजन; ज्युनिअर ते लेवल 5 आणि वैदिक मॅथ्सच्या विविध गटांत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याला वाव देण्यासाठी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 20 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. एमआयडीसी परिसरातील स्नेहालय येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनच्या अध्यक्षा हेमलता काळाणे व सचिव विशाल आढाव यांनी केले आहे.


विद्यार्थ्यांमध्ये गणितीय गणना, एकाग्रता, स्मरणशक्ती, अचूकता आणि वेग या कौशल्यांचा विकास व्हावा, तसेच त्यांच्या बौद्धिक क्षमतेला स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अबॅकस आणि वैदिक मॅथ्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित विषयाकडे अधिक आत्मविश्‍वासाने पाहण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेव्हल 1 ते लेव्हल 5 तसेच वैदिक मॅथ्स अशा विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असून, वेळेत अचूक गणिती गणना करण्यावर स्पर्धेचा भर राहणार आहे.


स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात विविध गटांतील स्पर्धा पार पडतील. त्यानंतर दुपारच्या सत्रात आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महापौर ज्योतीताई गाडे, नगरसेविका दिपालीताई बारस्कर, संध्याताई पवार, महेश तवले, मुख्याध्यापिका शितल गुंदेचा, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सौ. उज्वला मुरकुटे, योगा प्रशिक्षिका शिल्पा बालवे, मुख्याध्यापिका मिनाक्षी दगडे तसेच डोंगरे सर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीसह बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ विजेत्यांचाच नव्हे, तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा गौरव करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा बौद्धिक व कौशल्याधारित अबॅकस स्पर्धांचे महत्त्व मोठे असून, पालकांनी आपल्या पाल्यांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन हेमलता काळाणे व विशाल आढाव यांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *