स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीतील गणेशोत्सवाची सांगता; सर्वधर्मीय कामगारांनी दिला एकात्मतेचा संदेश
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’; एमआयडीसीत कामगारांचा जल्लोष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात झाली. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचे पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण, गाण्यांच्या तालावर धरलेला ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत कंपनी परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर शुक्रवारी विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या गणेश विसर्जन सोहळ्यास एक्साईड कंपनीचे प्लांट हेड शखदीप बर्धन, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे, कामगार संघटना सहसचिव सुनील कदम, हेमा शेळके, मनीषा झावरे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश शेरकर, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, एचआर हेड संजय तेनी, प्रोडक्शन हेड राहुल चव्हाण, सेफ्टी हेड अमोल अटक, इलेक्ट्रिशन हेड मुकेश बोडखे, गणेश उत्सव कमिटी कामगार प्रतिनिधी स्वप्निल खराडे, दिपक परभाने, वसीम शेख, अभिजीत साबारे, अजिनाथ शिरसाठ, रमेश शिंदे, प्रदीप दहातोंडे, शशिकांत संसारे, जितेंद्र तळेकर, किसन तरटे, संतोष शेवाळे, नामदेव झेंडे, रामनाथ घुगे, सचिन खेसे, पोपट जगताप, गौरव पाटोळे, शरद थोरात, रमेश देशमुख, अनिल बाचकर, राहुल जगधने, अमोल ठोकळ, फिरोज शेख, तुषार शेवाळे, निलेश शेवाळे, नितीन खेसे, तुषार शेवाळे, ज्ञानदेव तोडमल, महेश काळे, अनिल बाचकर, रमेश देशमुख, अनिल गायकवाड, रवि शेटे, सागर ठाणगे यांच्यासह कंपनीतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे कंपनीतील सर्वधर्मीय कामगारांनी एकत्रितपणे घेतलेला सहभाग. विविध धर्म आणि समाजघटकांतील कामगारांनी कोणताही भेद न ठेवता गणरायाच्या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे मिरवणुकीत धार्मिक सौहार्द, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर कामगारांनी उत्साहात ठेका धरला. गाण्यांच्या तालावर नृत्य करत आणि गणरायाच्या जयघोषात कामगारांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. महिला कामगारांनीही मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या निनादात कामगारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मोठ्या संख्येने कामगार मिरवणुकीत सहभागी झाल्याने गणेश विसर्जन सोहळ्याला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर विळद घाट येथील तलावात श्री गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. पाच दिवस भक्तिभावाने सेवा केलेल्या गणरायाला निरोप देताना कामगारांच्या चेहऱ्यावर उत्साहाबरोबरच भावुकताही दिसून आली. बाप्पाला निरोप देताना ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करण्यात आला. यावेळी गणेश भक्तांसाठी आमटी-भाकरी या पारंपरिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 3 हजार कामगारांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पाच दिवसांच्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देत एक्साईड कंपनीतील गणेशोत्सवाची सांगता झाली.

