• Sat. Sep 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘साहेब, आमची शिष्यवृत्ती केव्हा येणार?’; कचरा वेचकांच्या मुलांची समाजकल्याण अधिकाऱ्यांसमोर आर्त हाक

ByMirror

Sep 18, 2026
‘साईट दुरुस्ती’च्या कारणामुळे वर्षभर रखडली मदत; विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठत वेधले लक्ष

वर्षभरापासून ₹3,500 शिष्यवृत्ती प्रलंबित; विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देत मांडली व्यथा, तातडीने कार्यवाहीचे अधिकाऱ्यांचे आश्‍वासन


‘साईट दुरुस्ती’च्या कारणामुळे वर्षभर रखडली मदत; विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठत वेधले लक्ष


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “साहेब, आमची शिष्यवृत्ती केव्हा येणार? आमचे आई-बाबा कचरा वेचण्याचे काम करतात. आमची आर्थिक परिस्थिती खूप अडचणीची आहे. शिक्षणासाठी आम्हाला या शिष्यवृत्तीची गरज आहे,” अशा शब्दांत कचरा वेचकांच्या पाल्यांनी समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. मागील वर्षापासून शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने अखेर विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) थेट जिल्हा परिषद गाठत शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी विद्यार्थ्यांनी समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांना गुलाबपुष्प देत आपल्या हक्काच्या शिष्यवृत्तीची आठवण करून दिली.


अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या कचरा वेचकांच्या पाल्यांना शासनाच्या माध्यमातून दरवर्षी 3 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. कचरा वेचक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम शिक्षणाच्या खर्चासाठी महत्त्वाची ठरते. मात्र, अहिल्यानगर शहरातील पात्र विद्यार्थ्यांना मागील वर्षाची शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नसल्याने त्यांच्या शिक्षणासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.


शिष्यवृत्ती मिळण्यासाठी कचरा वेचक पालक अस्वच्छ व्यवसायात काम करत असल्याचे प्रमाणपत्र आवश्‍यक असल्याचे सांगण्यात येत होते. संबंधित पालकांकडे हे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. संघटनेच्या प्रयत्नांतून संबंधित कचरा वेचक पालकांना ते अस्वच्छ व्यवसायात काम करत असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. तसेच अहिल्यानगर शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि आवश्‍यक कागदपत्रे संबंधित शाळांकडे देण्यात आली. त्यामुळे प्रमाणपत्राचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला.


मात्र, आवश्‍यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यानंतरही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने संघटनेने पुन्हा पाठपुरावा सुरू ठेवला. गेल्या वर्षभरापासून यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे संघटनेने सांगितले. शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन प्रक्रियेबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, “ऑनलाइन साईटच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे,” असे सांगण्यात येत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींचा फटका गरीब कचरा वेचक कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.


कचरा वेचकांचे आई-वडील शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज अस्वच्छ आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. अत्यंत मर्यादित उत्पन्नात ते आपल्या मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी 3 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत ठरते. त्यामुळे मागील वर्षाची प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली.


शिष्यवृत्तीचा प्रश्‍न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कचरा वेचकांच्या पाल्यांनी समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी “साहेब, आमची शिष्यवृत्ती केव्हा येणार?” असा सवाल केला. आपल्या अडचणी सांगताना विद्यार्थ्यांनी गुलाबाचे फूल देऊन अधिकाऱ्यांचे लक्ष या प्रश्‍नाकडे वेधले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सांगत शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट केले. कचरा वेचक पालकांच्या अत्यल्प उत्पन्नामुळे शालेय साहित्य, शैक्षणिक शुल्क आणि इतर शैक्षणिक खर्च भागविताना अडचणी येत असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी बोलताना कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास भाऊसाहेब उडानशिवे म्हणाले की, प्रमाणपत्राचा प्रश्‍न संघटनेने पाठपुरावा करून सोडविला. विद्यार्थ्यांची नावे व आवश्‍यक कागदपत्रेही शाळांकडे देण्यात आली आहेत. तरीही वर्षभरापासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ‘साईट दुरुस्तीचे काम सुरू आहे’ असे सांगून विद्यार्थ्यांना आणखी किती काळ प्रतीक्षा करायला लावणार? कचरा वेचकांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी त्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती तातडीने मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


पुढे ते म्हणाले की, “कचरा वेचकांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती मिळेपर्यंत संघटना शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील. वेळप्रसंगी आंदोलन करण्याची वेळ आली, तर कचरा वेचकांच्या पाल्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे करू.”
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्‍नाची दखल घेत समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे लिहून घेतली. तसेच त्यांच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शिष्यवृत्ती मिळण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्तीचा प्रश्‍न मार्गी लागण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून पात्र विद्यार्थ्यांना विलंब न करता शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सोमनाथ लोखंडे, मनोहर चखाले, सागर खुडे, तुषार शिंदे तसेच कचरा वेचकांचे पाल्य उपस्थित होते. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नाची दखल घेत तातडीने कार्यवाहीच्या सूचना केल्याबद्दल कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *