• Thu. Sep 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

बीडला रेल्वेची सुविधा; मग अहिल्यानगरकरांच्या सुविधांना कात्री का?

ByMirror

Sep 16, 2026

बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वेचे स्वागत; मात्र आरक्षण खिडकीची वेळ कमी करण्यास इंटरसिटी असोसिएशनचा विरोध


नवीन रेल्वे आली; पण अहिल्यानगरच्या सुविधांमध्ये कपातीचा निषेध; आरक्षण खिडकी रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासह सकाळच्या इंटरसिटीची मागणी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वे सेवा सुरू होत असल्याने बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांना रेल्वे कनेक्टिव्हिटीची नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. बीडकरांसाठी ही रेल्वे सेवा स्वागतार्ह असल्याचे सांगत अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी ट्रेन असोसिएशनने रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, नवीन रेल्वे सेवेमुळे अहिल्यानगरच्या विद्यमान आरक्षण सुविधांमध्ये कपात केली जात असल्याचा आरोप करत असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘बीडला सुविधा द्या; पण अहिल्यानगरची सुविधा हिरावून घेऊ नका’, अशी भूमिका घेत असोसिएशनने अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकीची वेळ पूर्वीप्रमाणे रात्री 8 वाजेपर्यंत ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन रेल्वे सेवेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.


रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुणे-बीड एक्स्प्रेस पुणे येथून रात्री 10.45 वाजता सुटून अहिल्यानगर येथे रात्री 1.30 ते 1.40 दरम्यान पोहोचणार असून सकाळी 6 वाजता बीडला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात बीडपुणे एक्स्प्रेस रात्री 9.30 वाजता बीडहून सुटून मध्यरात्रीनंतर 12.55 ते 1.05 दरम्यान अहिल्यानगरला येणार असून पहाटे 5.20 वाजता पुण्यात पोहोचणार आहे. या वेळापत्रकामुळे अहिल्यानगरकरांची सकाळच्या वेळेत पुण्यात पोहोचणारी आणि संध्याकाळी पुण्याहून परतणारी इंटरसिटी रेल्वेची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नसल्याची भूमिका असोसिएशनने व्यक्त केली आहे.


अहिल्यानगरहून पुण्याकडे जाणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच नियमित प्रवाशांसाठी सकाळची रेल्वे अधिक सोयीची ठरू शकते. मात्र, रात्री उशिरा अहिल्यानगरहून सुटणारी किंवा मध्यरात्री येथे पोहोचणारी सेवा दैनंदिन प्रवाशांच्या गरजांना कितपत पूरक ठरेल, असा सवाल असोसिएशनने उपस्थित केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष हरजीतसिंग वाधवा यांनी सांगितले की, नवीन रेल्वे सेवेमुळे अहिल्यानगरकरांना पुणे इंटरसिटीचे स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष वेळापत्रक पाहता नियमित प्रवाशांना या रेल्वेचा अपेक्षित फायदा कितपत मिळेल, हा प्रश्‍न कायम आहे.


अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकीची वेळ कमी करण्याचा निर्णय हा असोसिएशनच्या नाराजीचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी आरक्षण तिकीट खिडकी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होती. आता ही सुविधा सकाळी 8 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंतच उपलब्ध राहणार आहे. यामुळे नोकरदार, औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी, व्यापारी, संरक्षण दलातील जवान तसेच दिवसभर कामानिमित्त बाहेर असणाऱ्या प्रवाशांना आरक्षणासाठी अडचणी येण्याची शक्यता असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.


अहिल्यानगर हे महत्त्वाचे लष्करी केंद्र असून, अनेक लष्करी कर्मचारी कामकाज संपल्यानंतर रेल्वे स्थानकावर येतात. त्याचप्रमाणे MIDC व अन्य औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी आणि व्यापारी वर्गालाही सायंकाळीच रेल्वे आरक्षणासाठी वेळ मिळतो. त्यामुळे दुपारी 3.30 नंतर आरक्षण खिडकी बंद राहिल्यास या प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.


अशोक कनाडे यांनी आरक्षण खिडकीच्या वेळेत कपात करण्याच्या निर्णयाचा निषेध केला. “बीडला सुविधा देण्यास आमचा विरोध नाही. मात्र अहिल्यानगरमधील विद्यमान आरक्षण सुविधा कमी करून बीडची सुविधा निर्माण करणे योग्य नाही. नवीन रेल्वेसाठी नवीन कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत आणि अहिल्यानगरची तिकीट खिडकी पूर्वीप्रमाणे रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवावी,” अशी मागणी त्यांनी केली.


संजय सपकाळ यांनी सांगितले की, अहिल्यानगरकरांची मागणी केवळ रेल्वे सुरू करण्याची नसून, त्यांच्या दैनंदिन गरजांना पूरक अशा वेळेत पुण्याशी जोडणारी इंटरसिटी सेवा मिळण्याची आहे. रात्री उशिराची व पहाटेची वेळ नियमित नोकरदार आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी अपेक्षित सेवा ठरत नसल्याचे त्यांनी म्हटले. प्रशांत मुनोत यांनीही बीडपुणे रेल्वे सेवेचे स्वागत करताना एका शहराची सुविधा वाढविताना दुसऱ्या शहराची विद्यमान सुविधा कमी करू नये, अशी भूमिका मांडली. अहिल्यानगरची आरक्षण सुविधा कायम ठेवून दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.


अहिल्यानगर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असून शहराचे औद्योगिक, लष्करी, शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक महत्त्व आहे. नवीन बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वे सेवेमुळे भविष्यात या स्थानकाचे महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. बीड आणि परिसरातील प्रवाशांसाठी अहिल्यानगर हे महत्त्वाचे रेल्वे कनेक्टिव्हिटी केंद्र बनू शकते. त्यामुळे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता असताना विद्यमान सुविधा कमी करण्याऐवजी त्यामध्ये वाढ करणे आवश्‍यक असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
“अहिल्यानगर जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहराचे महत्त्व वाढत आहे, रेल्वे वाहतूक वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन रेल्वे सेवेमुळे प्रवाशांची संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत आरक्षण खिडकीची वेळ कमी करण्याऐवजी सुविधा वाढविण्याची गरज आहे,” अशी भूमिका हरजीतसिंग वाधवा यांनी मांडली. असोसिएशनच्या माहितीनुसार, अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे 350 ते 400 तिकिटांची विक्री, तर विविध रेल्वे सेवांसाठी सुमारे 150 ते 180 तिकिटांचे आरक्षण केले जाते. नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.


स्थानकावरील इंटरनेटचा वेग अनेकदा कमी असल्याने आरक्षण प्रक्रियेस वेळ लागतो, असा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे तिकीट खिडकीची वेळ कमी करण्याऐवजी अतिरिक्त मनुष्यबळ, अधिक तिकीट खिडक्या आणि सक्षम इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वे सेवेचे स्वागत करत असतानाच अहिल्यानगरकरांना त्यांच्या दैनंदिन गरजांनुसार पुण्याशी जोडणारी इंटरसिटी सेवा मिळावी, अशी मागणी असोसिएशनने पुन्हा केली आहे.


अहिल्यानगरकरांना सोयीच्या वेळेत पुण्याशी जोडणारी इंटरसिटी रेल्वे मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,” असा निर्धार हरजीतसिंग वाधवा यांनी व्यक्त केला. या निर्णयाचा अशोक कनाडे, प्रशांत मुनोट, संजय सपकाळ, अर्शद शेख, सुनील छाजेड, विपुल शहा, संजय वाळुंज, सुनील थोरात, संतोष बडे आदी सदस्यांनी निषेध व्यक्त केला आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट सुविधा पूर्वीप्रमाणे रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवावी, बीडसाठी स्वतंत्र अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि अहिल्यानगरपुणे इंटरसिटी रेल्वेची मागणी सकारात्मकपणे विचारात घ्यावी, अशी मागणी अहिल्यानगरपुणे इंटरसिटी ट्रेन असोसिएशनने केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *