डमाळ-भासार परिवाराचा पर्यावरणपूरक उपक्र; “एक पेड माँ के नाम” उपक्रमातून मातृस्मृतीला अनोखी आदरांजली
जय हिंद फाउंडेशनला 500 वडाची रोपे; योग्य पद्धतीने लागवड व संवर्धनाचा संकल्प
आईच्या नावाने झाडे लावणे हीच खरी आदरांजली -शिवाजी पालवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वडुले बु. (ता. शेवगाव) येथील कै. चंद्रभागाबाई विनायक डमाळ यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डमाळ व भासार परिवाराच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. आईच्या पुण्यस्मरणाची आठवण कायमस्वरूपी जपण्याबरोबरच समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिवाराने तब्बल 501 वडाच्या झाडांचे वाटप करून चंद्रभागाबाई डमाळ यांना अनोखी आदरांजली वाहिली.
भास्कर डमाळ, बाबासाहेब डमाळ, शिवाजी डमाळ, सिंधूताई भासार, प्रशांत अशोकराव भासार, प्रमोद भासार व परिवारातील सदस्यांनी हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला. या उपक्रमातून आईच्या स्मृतीला केवळ श्रद्धांजली न वाहता तिच्या नावाने समाज व पर्यावरणासाठी उपयुक्त कार्य करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे यांनी डमाळ व भासार परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “आईच्या पुण्यस्मरणानिमित्त राष्ट्रीय वृक्ष असलेल्या वडाची झाडे वाटप करणे हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे. मनुष्याच्या जीवनातील सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी झाडे लावण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे.”
सध्या पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडत असून पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा ऱ्हास याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. “आज आपण झाडे लावली नाहीत, तर भविष्यात त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल,” असेही शिवाजी पालवे यांनी सांगितले.
डमाळ व भासार परिवाराने आईच्या नावाने जय हिंद फाउंडेशन, अहिल्यानगर यांना 500 वडाची रोपे दिली आहेत. या रोपांची योग्य ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून त्यांचे नियमित संवर्धन करण्यात येणार असल्याचे शिवाजी पालवे यांनी स्पष्ट केले. वडाचे झाड पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे असून त्याच्या माध्यमातून जैवविविधतेला तसेच पर्यावरणीय संतुलनाला हातभार लागतो. त्यामुळे मातृस्मरणातून करण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
कार्यक्रमास सरपंच भिमराज सागडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रभाकर डमाळ, माजी चेअरमन गंगाधर चोपडे, व्हाईस चेअरमन गणेश पाखरे, भाऊसाहेब पालवे, सुधाकर डमाळ, बाळासाहेब डमाळ, भास्कर डमाळ, बाबासाहेब डमाळ, शिवाजी डमाळ, सिंधूताई भासार, प्रशांत अशोकराव भासार, प्रमोद भासार, विष्णू डमाळ, मच्छिंद्र डमाळ, मोहन डमाळ आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी कै. चंद्रभागाबाई डमाळ यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभक्त परायण विष्णू महाराज नजन यांचे कीर्तन झाले. महाराजांनीही “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाचे कौतुक करून मातृस्मरणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या परिवाराचे अभिनंदन केले.आभार माजी सैनिक भाऊसाहेब पालवे यांनी मानले.

