• Sat. Sep 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना ‘दादासाहेब फाळके स्मृतीदिन सन्मान पुरस्कार’ जाहीर

ByMirror

Sep 18, 2026
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडविण्याचा निर्धार; पैलवान नाना डोंगरे यांचा पुढाकार

नाशिक मध्ये होणार गौरव; सामाजिक कार्याची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा ‘चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतीदिन सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कलावंत विचार मंच, नाशिक आणि कमल फिल्म प्रोडक्शन, कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कलावंत विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोंढे यांनी पत्राद्वारे पुरस्काराची घोषणा केली आहे.


पै. नाना डोंगरे हे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष असून ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी नगर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य आणि धार्मिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक विधायक उपक्रमांना चालना दिली आहे.


पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाच्या मोहिमा राबविणे, स्वच्छता अभियान, जलसंधारणाबाबत जनजागृती, रक्तदान शिबिरांचे आयोजन, मतदार जनजागृती, महिला सक्षमीकरण तसेच स्त्री जन्माचे स्वागत अशा विविध उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत.


ग्रामीण युवकांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी युवा संमेलने, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महिला बचत गट मेळाव्यांचे आयोजन करून ग्रामीण महिलांना संवाद आणि सहभागाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कामही त्यांनी केले. साहित्य क्षेत्रातही पै. डोंगरे यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमींना शहरापुरते मर्यादित न ठेवता गावपातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने आणि सहा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. या माध्यमातून ग्रामीण साहित्यिकांच्या लेखनाला प्रोत्साहन मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


सामाजिक कार्यासोबतच कला, संस्कृती, क्रीडा आणि धार्मिक उपक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग ठेवला आहे. विविध क्षेत्रांना जोडणाऱ्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीला चालना दिली आहे. पै. नाना डोंगरे यांच्या या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतीदिन सन्मान पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *