• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाजप नगरसेवक सागर मुर्तडकर यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानेही फेटाळला

ByMirror

Oct 18, 2026
परावलंबी व दुर्धर व्याधींनी पीडितांसाठी पुढाकार

शहरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे रोडवर गेल्या महिन्यात तरुण व्यावसायिक रोहित पाथरकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भाजप नगरसेवक सागर राजू मुर्तडकर (वय 32 वर्षे, रा. वंजार गल्ली, मंगलगेट) यांना न्यायालयाकडून दणका बसला आहे. जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुर्तडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुर्तडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयातही मुर्तडकर यांना दिलासा मिळू शकला नसून काल (दिनांक 16) झालेल्या सुनावणीत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.


गेल्या महिन्यात 14 सप्टेंबरच्या मध्यरात्री नगर-पुणे रोडवरील राजश्री हॉटेल समोर रोहित पाथरकर यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सागर मुर्तडकर आणि त्यांच्या इतर चार साथीदारांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सागर मुर्तडकर यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला.


युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने नगरसेवक सागर मुर्तडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, त्यानंतर मुर्तडकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी यावर सुनावणी झाली व न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने एन. बी. नरवडे यांनी काम पाहिले.



न्यायालयासमोर आलेले मुद्दे
फिर्यादी रोहित पाथरकर यांना झालेली मारहाण अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, त्यांच्या चेहऱ्याचे आणि नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. तसेच आरोपीने फिर्यादीच्या छातीवर बसून नाक-तोंड दाबून श्‍वास कोंडत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय अहवालातही दोन गंभीर दुखापतींसह एकूण आठ जखमांची नोंद आहे. अशा गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला जामीन दिल्यास तपासावर दबाव येऊ शकतो, असे मुद्दे सरकार पक्ष व फिर्यादीच्या वकिलांच्या वतीने न्यायालयासमोर मांडले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *