मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात प्रकाश पेरण्याचा संकल्प
नातेवाइकांच्या दशक्रियाविधीप्रसंगी मनातील विचारांना दिले मुर्तस्वरुप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मृत्यूनंतरही आपले शरीर समाजाच्या उपयोगी पडावे, आपल्या अवयवांमुळे गरजू व्यक्तींना नवजीवन मिळावे आणि देहदानातून वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन व शिक्षणाला हातभार लागावा, या उदात्त भावनेतून शिरूर येथील काशिनाथ जगताप यांनी नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाचा अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात संकल्प अर्जाने केला. विशेष म्हणजे, या सामाजिक जाणीवेतून त्यांनी स्वतःसोबत आपल्या पत्नीलाही या संकल्पात सहभागी करून घेतले. जगताप दाम्पत्याच्या या निर्णयातून सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन घडविले.
शुक्रवारी (दि. 16 ऑक्टोबर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे हा संकल्प नोंदविण्यात आला. काशिनाथ जगताप हे नातेवाइकांच्या दशक्रियाविधीसाठी शिरूर येथून अहिल्यानगर येथे आले होते. यावेळी मानवी जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी करण्याची संधी या विचारांनी त्यांच्या मनात घर केले. मृत्यूनंतर शरीराचा उपयोग वैद्यकीय सेवेसाठी होऊ शकतो, तसेच अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते, ही जाणीव त्यांना झाली. या विचारातून त्यांनी नेत्रदान, अवयवदान आणि देहदान करण्याचा निर्णय घेतला.
मनात आलेला हा विचार केवळ विचारांपुरता मर्यादित न ठेवता त्यांनी तातडीने कृतीत आणला. श्याम पारेकर यांच्यासोबत ते अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तेथील नेत्र विभागात त्यांनी नेत्रदान, अवयवदान आणि देहदानासंदर्भात सविस्तर माहिती घेतली. या प्रक्रियेबाबत त्यांच्या मनात असलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना संकल्प नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगितली.
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून मिळालेल्या माहितीमुळे जगताप यांना या संकल्पाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे आपल्या पत्नीलाही या उपक्रमाची माहिती दिली. समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्याच्या या निर्णयाला पत्नीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर जगताप दाम्पत्याने नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाचे ऑनलाइन संकल्प अर्ज भरून दिले. नेत्रदान, अवयवदान आणि देहदानासाठीची प्रक्रिया सोपी व सुलभ असल्याचे अनुभवातून लक्षात आल्यानंतर जगताप यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील संपूर्ण पथकाचे त्यांनी आभार मानले.
कािशिनाथ जगताप यांनी नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प केल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुचेता यादव, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रविण बोठे, असंसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. अरुण सोनवणे आणि नेत्र विभागातील सतीश आहिरे उपस्थित होते.
मानवी जीवन अनमोल आहे. मात्र, मृत्यूनंतरही आपल्या शरीराच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करता येऊ शकतो. नेत्रदानामुळे दृष्टी मिळविण्याची संधी निर्माण होऊ शकते, अवयवदानामुळे पात्र रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकते, तर देहदान वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. याच सामाजिक जाणीवेतून जगताप दाम्पत्याने घेतलेला निर्णय इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे. नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाविषयी समाजात जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. या विषयांबाबत असलेले गैरसमज दूर करून अधिकाधिक नागरिकांनी या सामाजिक कार्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुचेता यादव यांनी व्यक्त केली.

