नवरात्रोत्सवात रक्तदानातून मानवसेवेचा जागर; भक्तीच्या वाटेवर सामाजिक बांधिलकी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या भक्तिभावाला सामाजिक बांधिलकीची जोड देत एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांनी रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श घालून दिला. यावेळी रक्तदानाबरोबरच भाविकांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीही करण्यात आली.
श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ट्रस्टने केला आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिर आणि दररोज विविध आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. अपघात, गंभीर आजार, शस्त्रक्रिया तसेच विविध वैद्यकीय उपचारांदरम्यान अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. अशा वेळी रक्तदात्यांनी केलेले रक्तदान गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते. ही सामाजिक गरज लक्षात घेऊन ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानात सहभाग घेत सामाजिक जाणीव जपली.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत कामाचा व्याप, बदललेल्या सवयी आणि वेळेचा अभाव यामुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांचे निदान वेळेवर होत नाही. अनेकदा आजाराची लक्षणे जाणवू लागल्यानंतरच तपासणी केली जाते. मात्र, नियमित आरोग्य तपासणी केल्यास संभाव्य आरोग्यविषयक समस्या वेळीच लक्षात येण्यास मदत होते आणि वेळेवर उपचार करता येते. ही बाब लक्षात घेऊन श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या रक्तदान शिबिराप्रसंगी श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर उपस्थित होते. तसेच सुरभी ब्लड बँकेचे ज्ञानदेव सांगळे यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
अध्यक्ष प्रभाकर भोर म्हणाले की, नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून सेवा करण्याची संधी आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक निरोगी आणि पात्र व्यक्तीने रक्तदानाचे महत्त्व समजून घेत या चळवळीत सहभागी व्हावे. रक्तदान हे केवळ दान नसून, एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनाची नवी आशा देण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिव दत्तात्रय विटेकर म्हणाले की, श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. रक्ताची गरज कोणालाही, कधीही भासू शकते. अशा वेळी रक्तदात्यांनी केलेले रक्तदान रुग्णांसाठी अत्यंत मोलाचे ठरते. त्यामुळे रक्तदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना रक्तदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या रक्तदान शिबिरांसाठी सुरभी ब्लड बँक आणि सार्इसेवा ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.

